

सांगली : पतीची कोणतीही संमती न घेता इन्कम टॅक्स खात्याचा युजर आयडी आणि पासवर्ड बेकायदेशीरपणे वापरून आयटी रिटर्नचा गोपनीय डाटा डाऊनलोड केल्याप्रकरणी पत्नीविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
जिशानअली इफ्तेखारअली पठाण (वय २८, रा. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांची पत्नी इफ्तेसार जिशानअली पठाण (वय २८, रा. खतीबनगर, कुपवाड रोड, मिरज) हिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विजयनगर येथील न्यायालयात कौटुंबिक दाव्याची सुनावणी सुरू असताना, संशयित महिलेने पतीच्या परवानगीशिवाय त्यांच्या इन्कम टॅक्स खात्याचा युजर आयडी व पासवर्ड वापरला.
आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आयटी रिटर्नचा गोपनीय डाटा बेकायदेशीरपणे मिळवून त्याची प्रिंट न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली. पतीची आर्थिक व गोपनीय फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.