

सांगली : सांगलीत शंभरफुटी रस्त्यालगत पठाण कॉलनी येथे शनिवारी एका घराला आग लागली. या आगीत पत्रा व लाकडी बांबूचे घर जळून खाक झाले. रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य जळाले. घरातील फ्रिजचा काम्प्रेसर फुटल्याने आग लागल्याचे समजते. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घरातील दोन एलपीजी सिलिंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.
शंभरफुटी रस्त्यालगत पठाण कॉलनीत प्रवीण कावेठिया यांच्या घराला शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली. घरमालक कपडे विक्री व्यवसायानिमित्त बाहेर होते. घराला कुलूप होते. बंद घरातून धूर बाहेर येत असल्याचे दिसताच स्थानिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. घर पत्र्याचे व लाकडी बांबूचे असल्याने आगीने मोठे स्वरूप घेतले.
महापालिकेच्या अग्निशमन दलाची दोन वाहनेही तत्काळ घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. घरातील एलपीजी सिलिंडर तत्काळ आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, माजी नगरसेवक फिरोज पठाण, मंगेश चव्हाण यांनी माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम जळून नुकसान झाले. कपाटातील मौल्यवान वस्तू मात्र सुरक्षित मिळाल्या. शेजारील घराच्या भिंतीस किरकोळ झळ बसली आहे.