

तासगाव : तासगाव शहरातील दीड दिवसांच्या गणपती रथोत्सवासाठी कुटुंबीय बाहेर गेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सव्वातीन तोळे वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र चोरून नेले. ही घटना १५ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी नेताजी रंगराव आडसूळ (वय ४५, रा. दडवळेस, तासगाव) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नेताजी आडसूळ घरात होते. त्यांची पत्नी व मुले ही गणपती रथोत्सवासाठी तासगाव शहरात गेली होती. रात्री साडेआठच्या सुमारास पत्नीचा फोन आला. त्या सिद्धेश्वर मंदिराजवळ आल्या असून, त्यांना घेण्यासाठी येण्यास सांगितले. त्यानंतर आडसूळ यांनी घराला कुलूप लावले आणि ते कुटुंबीयांना आणण्यासाठी घराबाहेर पडले.
काही वेळाने ते कुटुंबीयांसह घरी परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील कपाट व लोखंडी तिजोरीचे लॉकही उघडलेले आढळून आले. तिजोरी तपासली असता त्यामधील सोन्याचे मणीमंगळसूत्र चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. तक्रारीत या दागिन्याचे वजन ३३ ग्रॅम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. घराच्या परिसरात यापूर्वी दोन अनोळखी व्यक्ती फिरताना दिसल्याचेही आडसूळ यांनी तक्रारीत सांगितले आहे. या घटनेनंतर तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून या घरफोडीचा तपास सुरू आहे.
चोरट्यांशी दोनहात करीत सोने वाचवले
दरम्यान, नेताजी आडसूळ हे कुटुंबीयांना घेऊन घरी आले असता दरवाजा उघडा दिसला. त्यांनी तत्काळ घराकडे धाव घेतली असता दोन व्यक्ती घरातून बाहेर पिशवी घेऊन पळत जाताना दिसल्या. त्यांनी त्या व्यक्तींना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या पिशवीमधील तब्बल ९ तोळे सोने वाचवण्यात त्यांना यश आले. दरम्यान, आडसूळ यांना हिसडा देऊन चोरटे पळून जात असताना त्यांनी आरडाओरड सुरू केली. यावेळी त्या चोरट्यांवर परिसरातील महिलांनी दगडफेक करून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.