

सांगली ः व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांच्या दरात पाच ते दहा रुपयांनी वाढ केलेली आहे. काही हॉटेलमधील मेनूकार्डातीस पदार्थ सध्या देऊ शकत नाही, असे सांगितले जाते. सांगली शहर आणि परिसरातील हे चित्र आहे. काही हॉटेल व्यावसायिकांनी या गॅसचा काळाबाजार सुरू आहे, चढ्या दराने गॅस घ्यावा लागत आहे, आम्ही हॉटेल कसे चालवायचे, अशी अगतिकता व्यक्त केली. युद्धाचे परिणाम असे सामान्यांना भोगावे लागत आहेत.
फारसा फरक नाही
तासगाव : तासगाव शहर आणि तालुक्यात हॉटेल, ढाबे, नाष्टा सेंटरमधून फारसा परिणाम जाणवत नाही. अनेक व्यावसायिकांनी पर्यायी सोय केली आहे. विजेची उपकरणे बसविली आहेत. काही नाष्टा सेंटर चालकांनी कोळसाचा वापर सुरू केला आहे. दर मात्र वाढवलेले नाहीत.
मिरज परिसरात कोळशांच्या चुलीचा वापर
मिरज : मिरज शहरासह ग्रामीण भागामध्ये अनेक हॉटेल्समध्ये कोळसा आणि लाकडावरील चुलींचा वापर केला जात आहे. शहरात व ग्रामीण भागात घरांमध्ये अनेकांनी आता इलेक्ट्रिक शेगडी, काहींनी कोळशाची शेगडी, शिवाय पारंपरिक चुलीचाही वापर सुरू केला आहे. काहींनी गॅस उपलब्ध केला आहे, मात्र त्यांनी जेवणाच्या दरामध्ये वाढ केली आहे. अनेक हॉटेलमध्ये खाद्याच्या दरांमध्ये वाढ न करता चुलीचा वापर केला आहे.
जत शहर : जत तालुक्यातील अनेक व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांच्या दरात 5 ते 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. काही ठिकाणी ही वाढ 15 ते 20 टक्क्यांपर्यंत आहे.
दरवाढ कायम...
शिराळा शहर: तालुक्यात हॉटेल व्यावसायिकांनी दरवाढ केली आहे. अनेकांनी सरपण, लाकडाचा वापर करून चुली पेटवल्या आहेत. नियमित ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी हॉटेल सुरू ठेवली आहेत.
2-5 टक्क्यांपर्यंत वाढ
ईश्वरपूर ः हॉटेलमधील मेनूत कपात केली आहे. खाद्य पदार्थांच्या दरामध्ये 2-5 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. पारंपरिक चूल, कोळशावरील शेगड्या सुरू केल्या आहेत. वाळवा तालुक्यात 375 आसपास हॉटेल, ढाबे आहेत. गॅस नसल्याने काहींनी हॉटेल बंद ठेवले आहेत. जादा इंधन लागणारे आंबोळी, उत्तप्पा, डोसा, पनीर चिली, गोबी मंचुरीयन आदी खाद्य पदार्थ बनवणे काही हॉटेल मालकांनी बंद केले आहे. चपातीऐवजी चुलीवरील भाकरी दिली जात आहे. स्पेशल चहाऐवजी उकळून ठेवलेला साधा चहाच ग्राहकांना दिला जात आहे.
मधुमेहींची अडचण
मधुमेही ग्राहकांना बिगर साखर चहा लागतो. त्या एखाद्या ग्राहकासाठी वेगळा चहा करणे हॉटेल मालकाला परवडत नाही. बहुसंख्य हॉटेल मालकांनी बिगर साखर चहा देणे बंद केले आहे.