

सांगली : वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) बसविण्याबाबत शासनाकडून सातत्याने जनजागृती केली जाते. तसेच अशी नोंदणी म्हणजेच नंबर प्लेट न बसविल्यास कारवाईचा इशारा दिला जात आहे. परंतु अजूनही अशी प्लेट न बसवलेल्या वाहनांचा टक्का मोठाच आहे. दस्तुरखुद्द शासकीय यंत्रणेतील अनेक वाहनांनाही एचएसआरपी नंबर प्लेट बसवल्याचे दिसत नाही. याचा अर्थ... लोका सांगे ब्रह्मज्ञान... असा होतो. नियम सांगणाऱ्यांनाच नियमांचा विसर... नियमाकडे कानाडोळा का? सामान्य वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, यासाठी प्रशासनाकडून सातत्याने सूचना केल्या जातात. मात्र, नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतीलच वाहनांबाबत नियमांचे पालन होत नसेल, तर सामान्यांनी आदर्श कोणाकडून घ्यायचा? 'आधी स्वतः नियम पाळा, मग जनतेला शिस्त शिकवा' अशी चर्चा होते आहे. शासकीय यंत्रणेतील वाहनांनाच नियमातून सवलत मिळत असेल, तर सर्वसामान्य वाहनधारकांकडून नियम पालनाची अपेक्षा कशी करणार? शासकीय कार्यालयांचा एक आढावा...
निर्णय केव्हापासून...
राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी बंधनकारक केली आहे.
दंड केव्हापासून...
१ जुलैपासून या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर व वाहतूक पोलिसांकडून १,००० रुपयांच्या दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे.
एचएसआरपी का लावायची?
एचएसआरपी नंबर प्लेटमुळे वाहनाची ओळख अधिक सुरक्षित होते, तसेच वाहन चोरी आणि बनावट नंबर प्लेटला आळा घालण्यास मदत होते. नंबर प्लेटमध्ये छेडछाड, बनावटगिरी व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यास तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एचएसआरपी बसवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
नसल्यास काय होते?
एचएसआरपी नसलेल्या वाहनांचे हस्तांतरण, पुनर्नोंदणी, वाहनावरील बोजा उतरविणे अशा प्रक्रियांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत.
कशी असते प्लेट?
एचएसआरपी ॲल्युमिनियमपासून बनवलेली, लेसर कोड आणि होलोग्राम असलेली टेम्पर्ड-प्रूफ नंबर प्लेट असते. या प्लेटमुळे वाहनांची चोरी रोखणे, बनावट नंबर प्लेटचा वापर थांबवणे आणि गुन्हेगारीत वाहनांचा गैरवापर टाळणे सहजशक्य होते.
सम आर मोअर इक्वल का?
सामान्यांवर किरकोळ चुकीसाठी तत्परतेने दंडाचा बडगा उगारणारे प्रशासन, नियम मोडणाऱ्या लोकप्रतिनिधी व पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का? जेव्हा कायदा पाळणारे आणि बनवणारेच नियमांची पायमल्ली करतात, तेव्हा सामान्य जनतेने कोणाचा आदर्श घ्यावा?