

सांगली ः सांगलीसह जिल्ह्याच्या बहुतेक भागात शनिवारीही पाऊस सुरूच होता. सकाळपासूनच पाऊस सुरू झाला. दुपारनंतर पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली होती. सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. संततधार पावसामुळे ओढे, नाले भरून वाहत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
दरम्यान, जोरदार पावसामुळे खरीप हंगामाची तयारी खोळांबली आहे. पाऊस कधी थांबणार, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. गेल्या सहा दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. शनिवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला. बारानंतर पावसाने उघडीप दिली. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. मात्र सायंकाळी सहाच्या दरम्यान पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.
वाळवा आणि शिराळा तालुक्यांतील अनेक गावांत जोरदार पाऊस झाला. मिरज पश्चिम भागातही रिपरिप पावसाने हजेरी लावली. संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून राहिले आहे. नुकसान टाळण्यासाठी शेतातून पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकर्यांचा खटाटोप सुरू होता. पावसामुळे फळबागांसह उन्हाळी पिकांना फटका बसल्याचे चित्र आहे. खानापूर, तासगाव, जत तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावली.
खरीप हंगामाची तयारी करण्याचे सध्याचे दिवस आहेत. मात्र जोरदार पाऊस झाल्याने आता मशागती करण्यास अडथळा तयार झाला आहे. पावसाची उघडीप कधी मिळते, याकडे लक्ष लागले आहे.
सांगली शहरात सायंकाळी जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे शहरातील शिवाजी मंडई, स्टेशन रस्ता, शामरावनगर आदी परिसरात पाणी साचून होते. या पाण्याचा नागरिकांना ये- जा करण्यास त्रास होत होता. अनेक लोक अडकून पडले होते.