Sangli News : प्रशिक्षित परिचारिकांची कमतरता

सेवाभावाचा प्रश्न गंभीर
nurses requirement
प्रशिक्षित परिचारिकांची कमतरताFile Photo
Published on
Updated on

अंजर अथणीकर

सांगली : वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची वेगाने प्रगती होत असली, तरी आरोग्य सेवेचा मूळ मंत्र असलेला ‌‘सेवाभाव‌’ मात्र हरवत चालल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित आणि सेवाभावी परिचारिकांची कमतरता हा सर्वच रुग्णालयांसमोरील गंभीर प्रश्न ठरत आहे.

रुग्णालयाची प्रतिमा ही केवळ डॉक्टरांवर नव्हे, तर परिचारिका व ब्रदर्स यांच्या वागणुकीवरही अवलंबून असते. मात्र, सध्या या सेवाभावी वृत्तीचा अभाव जाणवत असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांकडूनही व्यक्त होत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये परिचारिकांना किमान वेतनही दिले जात नसल्याचे वास्तव आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांचे वेतन 50 हजारांपेक्षा अधिक असताना, खासगी क्षेत्रात केवळ 10 ते 30 हजारांपर्यंत मर्यादित आहे. याशिवाय कामाचा ताण, अनियमित वेळा, रात्रपाळी आणि सुरक्षिततेचा अभाव या समस्यांनाही त्यांना सामोरे जावे लागते. रुग्णसंख्येच्या तुलनेत परिचारिकांची संख्या कमी असल्याने एका परिचारिकेवर अनेक रुग्णांची जबाबदारी येते. अशा परिस्थितीत सेवाभाव टिकवणे कठीण होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

पूर्वी सांगली-मिरज परिसरात केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील परिचारिका मोठ्या प्रमाणावर कार्यरत होत्या. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे रुग्णांना उत्कृष्ट सेवा मिळत होती. मात्र, परदेशात अधिक चांगल्या संधी उपलब्ध झाल्याने त्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात घटली आहे. दरम्यान, नर्सिंग शिक्षणासाठी मोठा खर्च (सुमारे 5 लाख रुपये) असूनही, दरवर्षी सुमारे 600 परिचारिका सेवेत दाखल होत आहेत. तरीही गुणवत्तापूर्ण सेवाभावी परिचारिकांची कमतरता कायम आहे. खासगी रुग्णालयांमध्ये काही ठिकाणी अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडूनही परिचारिकांची कामे करून घेतली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

सांगली-मिरजमधील नर्सिंग स्थिती : एक दृष्टिक्षेप...

रुग्णालये : 450 पेक्षा अधिक

एकूण परिचारिका : सुमारे 6,000

शासकीय परिचारिका : सुमारे 1,500

नर्सिंग महाविद्यालये : 10

दरवर्षी नवीन भरती : 600

खासगी वेतन : 10,000 ते 30,000

शासकीय वेतन : 50,000 पेक्षा अधिक

ड्रेस कोडबाबत उदासीनता

खासगी रुग्णालयांमध्ये परिचारिकांसाठी ड्रेस कोडची सक्ती नसल्याने रुग्ण व नातेवाईकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. यासाठी स्पष्ट नियमांची आवश्यकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news