Sangli News : ३० वर्षांवरील प्रत्येकांची होणार आरोग्य तपासणी

मधुमेह, उच्च रक्तदाबासह तीन प्रकारच्या कर्करोगाचे होणार निदान; त्रास नसला तरी तपासणी गरजेची
Diabetes and BP
Diabetes and BPFile Photo
Published on
Updated on

सांगली : 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानांतर्गत जिल्ह्यात ३० वर्षे व त्यावरील सर्व महिला-पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. 'तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला' हे ब्रीदवाक्य घेऊन राबवल्या जाणाऱ्या या अभियानाची सुरुवात दि. १ सप्टेंबरपासून झाली असून, ही मोहीम १० डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच तोंड, स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांची विशेष तपासणी केली जाणार आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार राज्यात हे अभियान राबवले जात आहे. जिल्ह्यात या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती ऋषिकेश लाड, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे मार्गदर्शन करत आहेत. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम नियोजन करत आहे.

घराेघरी पोहोचणार आरोग्य पथके

ग्रामीण भागात 'आशा' स्वयंसेविका, आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवकांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. या पथकांच्या माध्यमातून दररोज ४० ते ४५ घरांना भेटी देऊन ३० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी होणार आहे. तपासणीदरम्यान उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास संबंधितांना योग्य समुपदेशन, औषधोपचार आणि पुढील उच्चस्तरीय उपचारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाकडून पाठपुरावा केला जाईल.

लक्षणे नसली तरी तपासणी करा

उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच काही प्रकारचे कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणे न दाखवता हळूहळू वाढतात. त्यामुळे 'मला कोणताही त्रास नाही' असे न म्हणता जिल्ह्यातील ३० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.

वेळीच तपासणी झाल्यास आजाराचे लवकर निदान होऊन उपचार सुरू करता येतात. संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी जीवनशैलीतील बदल, औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनही वेळेत मिळू शकते.
- ऋषिकेश लाड, उपाध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news