

सांगली : हॉकर्स, नो-हॉकर्स झोनचा तब्बल सोळा वर्षांचा प्रश्न अखेर सुटला. सांगली मध्यवर्ती बस स्थानक - महापालिका - राममंदिर ते मिरज गांधी चौक, मध्यवर्ती बस स्थानक - सिव्हिल चौक ते कर्मवीर भाऊराव पाटील चौक, राममंदिर ते शंभरफुटी रस्ता व कोल्हापूर रस्ता ते वालचंद कॉलेजपर्यंतचा शंभरफुटी रस्ता यांसह शहरातील प्रमुख रस्ते ‘नो-हॉकर्स झोन’ करण्यावर अखेर प्रशासन व फेरीवाले सदस्य यांच्यात एकमत झाले. महापालिका क्षेत्रात 30 ठिकाणी हॉकर्स झोन निश्चित केले आहेत.
राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत सोमवारी महापालिकेत फेरीवाला समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी आयुक्त सत्यम गांधी होते. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, पोलिस उपअधीक्षक विमला एम, महापालिकेचे सहायक आयुक्त तसेच फेरीवाला समितीचे सदस्य सुरेश टेंगले, कैल अलगूर, सादिक बागवान, निखिल सावंत, अमित मोतुगडे, बेबी मुल्ला, लता दुधाळ, रेखा पाटील, मुजीर जांभळीकर यावेळी उपस्थित होते.
महापालिका प्रशासनाने दि. 30 जूनरोजी फेरीवाला समितीत ‘हॉकर्स, नो-हॉकर्स झोन’ प्रस्तावित केले होते. यामध्ये 65 नो-हॉकर्स झोन होते. फेरीवाला प्रतिनिधींनी या प्रस्तावित नो-हॉकर्स झोनला विरोध केला होता. फेरीवाल्यांना विश्वासात न घेता परस्पर झोन ठरवल्यावरून संताप व्यक्त केला होता. त्यावर महापालिका प्रशासनाने सबुरीने घेत फेरीवाले, विक्रेत्यांशी संवाद साधला. आठवड्यात तीन बैठका झाल्या. रस्त्यांवरील फेरीवाल्यांमुळे निर्माण झालेली वाहतुकीची समस्या आणि नो-हॉकर्स झोनमुळे फेरीवाल्यांचे होणारे विस्थापन यावर सहमतीने तोडगा काढण्यात महापालिका प्रशासनाला अखेर यश आले. सोमवारी, 7 जुलै रोजी झालेल्या फेरीवाला समिती बैठकीत हॉकर्स, नो-हॉकर्स झोनवर सहमतीने शिक्कामोर्तब झाले. काही हॉकर्स झोनबाबत संबंधित व्यवस्थापनांशी महापालिका आयुक्त चर्चा करून मार्ग काढणार आहेत.
सांगली मध्यवर्ती बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महापालिका ते स्टेशन चौक ते राममंदिर ते मिरज गांधी चौक तसेच सांगली बस स्थानक ते कर्मवीर भाऊराव पाटील चौक हे दोन्ही प्रमुख रस्ते नो-हॉकर्स झोन करण्यात आले आहेत. सांगली-मिरज रस्त्याच्या सर्व्हिस रोडला हॉकर्स झोन असणार आहे. शंभरफुटी रस्ता, राममंदिर ते शंभरफुटी, आपटा पोलिस चौकी ते पट्टणशेट्टी शोरूम, महापालिका ते टिळक चौक हे प्रमुख रस्ते नो-हॉकर्स झोन निश्चित केले आहेत, अशी माहिती फेरीवाला समिती सदस्यांनी दिली.
कापडपेठ, गणपती पेठ, दत्त-मारुती रस्ता तूर्त ‘जैसे-थे’ राहील. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात मोकळ्या जागेत हॉकर्स झोनसंदर्भात एसटी विभागीय अधिकार्यांशी महापालिकेचे आयुक्त चर्चा करणार आहेत. सिव्हिल हॉस्पिटल ते गारपीर रस्त्यादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलच्या काही जागेत हॉकर्स झोनसंदर्भात महापालिका-सिव्हिल प्रशासन यांच्यात चर्चा होणार आहे. रिसाला रोडवरील हॉकर्स झोनबाबत पोलिस प्रशासनाशी चर्चेनंतर निर्णय होणार आहे.
सांगली मध्यवर्ती बस स्थानक - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - महापालिका मुख्यालय - स्टेशन चौक - काँग्रेस भवन - राम मंदिर - मिरज गांधी चौक रस्ता.
सांगली मध्यवर्ती बस स्थानक - सिव्हिल हॉस्पिटल चौक - कर्मवीर भाऊराव पाटील चौक.
राम मंदिर चौक - सिव्हिल हॉस्पिटल चौक - शंभरफुटी रस्ता
आपटा पोलिस चौकी - कॉलेज कॉर्नर - पट्टणशेट्टी शोरूम
शंभरफुटी रस्ता (कोल्हापूर रोड ते वालचंद अभियांत्रिकी कॉलेज)
महापालिका - हरभट रोड - टिळक चौक