

सांगली : सांगली - हरिपूर रस्त्याचे काम सुरू असताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली असून पाण्याची गळती होऊन पाणी रस्त्यावर आले आहे. ही गळती तातडीने थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. महापालिकेने गळती काढण्यासाठी रस्त्यावर भलामोठा खड्डा काढला. परंतु सध्या महापालिकेने गळतीही काढली नाही अन् खड्डाही मुजवला नाही. त्यामुळे सध्या भागात पिण्यासाठी पाणीही नाही अन् रस्त्यावर अडथळाही निर्माण झालेला आहे.
सांगली - हरिपूर रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना आठ दिवसापूर्वी अजिंक्य चौकात पिण्याची पाईपलाईन फुटली. पाणी रस्त्यावरून वाहू लागले. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली. महापालिकेकडे तातडीने येऊन गळती काढण्यासाठी भला मोठा खड्डा काढला. परंतु गळती न काढताच तो खड्डा तसाच ठेवला. पाणीही बंद केलेले आहे. त्यामुळे भागात पिण्याचा पाणी पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. खड्डा काढून ठेवल्यामुळे तो वाहतुकीस अडथळा ठरत आहे. रात्री अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे गळती काढून पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि खड्डा मुजवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. काम दर्जेदार व्हावे अन्यथा येथील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.