

हरिपूर : सांगली-हरिपूर रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाचा दर्जा योग्य आहे का, हे तपासणे गरजेचे आहे. २७ सप्टेंबरपासून सुरू झालेले काम सुरुवातीला गतीने होते. अवघ्या दीड महिन्यात काम पूर्ण होईल, असे वाटत असताना आता मात्र हे काम संथगतीने होत आहे.
हरिपूर-कोथळी पूल झाल्यामुळे या रस्त्यावरील रहदारी वाढली आहे. हरिपूर ते लिंगायत समाज स्मशानभूमी या रस्त्याच्या कामासाठी ठेकेदारांनी तीन वर्षे लावली. या तीन वर्षांत १६ कोटी रुपये खर्च आला. दोन वेळा काम बंद ठेवण्यात आले. याबाबत काही महिन्यांपूर्वी ‘पुढारी’ने आवाज उठवला असता रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या. काही ठिकाणी गतिरोधकही बसविण्यात आले. तरीही या कामात अनेक त्रुटी असल्याचे दिसून येत आहे.
रस्त्यावरून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. बाजूला गटारी बांधण्यात आलेल्या नाहीत. बाजूला करण्यात आलेला भराव अत्यंत कमी दर्जाचा असून, पावसाने तो वाहून जाण्याची शक्यता आहे. तर उतार न केल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचत आहेत. सांगली आणि हरिपूरदरम्यानचा काळीवाट येथील ३० मीटरच्या रस्त्याचे काम रखडले आहे. याचे कारण काय, हे समजू शकले नाही.
लोखंडी पूल अरुंद असताना तेथे रस्ता मात्र मोठा करण्यात आला आहे. या पुलावरील रस्त्याचे कामही मोजमापानुसार करण्यात आले आहे. बाजूला भराव केलेला नाही. या बाजूच्या पट्ट्या कधी भरणार आहेत. हे काम किती दिवस चालणार, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. या रस्त्याच्या कामामुळे श्रावण, गणपती, नवरात्रोत्सव अशा अनेक सणांदरम्यान भाविकांना गैरसाय सहन करावी लागली. आता दिवाळीचा सण आला, तरीही याकडे शासनाचे लक्ष नाही.
शास्त्री चौकातही रस्त्याचे काम झाले आहे. मात्र बाजूच्या पट्ट्या कधी भरणार, असा सवाल तेथील फूल विक्रेते, सलून, चहाची दुकाने, टेलर, पानटपऱ्या, गॅरेज अशा विविध दुकानदारांमधून होत आहे. रस्त्याच्या कामामुळे या दुकानदारांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सेनामंदिर ते प्रशिक चौक आणि शिकलगार गल्ली ते रेणुका मंदिर या मार्गावरील रस्ता उंच-सखल झाला आहे. रस्त्याला योग्य उतार न दिल्याने या भागातून वाहनांना ये-जा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना सिद्धार्थ परिसर किंवा काळीवाट मार्गे जावे लागत आहे. रस्ता दीड ते दोन फूट उंच झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास मार्गच राहिलेला नाही.