Sangli Crime: सांगलीत सराईत चोरटा ताब्यात

११ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
theft
theftPudhari
Published on
Updated on

​सांगली : मोबाईल शोरूम आणि दुकाने फोडून धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या. बसवराज परसाप्पा हरिजन (वय २२, मूळ रा. गडी सोमनाळ, ता. तालिकोटी, जि. विजापूर, कर्नाटक; सध्या रा. इंद्रप्रस्थनगर, सांगली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून घरफोडीच्या चार वेगवेगळ्या गुन्ह्यांतील तब्बल ११ लाख ९ हजार ९८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ ऑगस्टच्या रात्री ते दि. ५ ऑगस्ट २०२६ च्या सकाळी १०:१५ च्या दरम्यान विश्रामबाग व सांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल शोरूम व दुकाने फोडण्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी प्रदीप गजानन देसाई (वय ६४), नंदकुमार उत्तम भोसले (वय ३२), मनोजकुमार प्रकाश वारे (वय ४५) आणि मोहन नारायण वाचाली (वय ५५) यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. यावरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात तीन, तर सांगली शहर पोलिस ठाण्यात एक असे घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या गुन्ह्यांचा तपास करत असताना विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, योगेश पाटील व गणेश बामणे यांना गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयिताची माहिती मिळाली. पोलिस पथकाने तातडीने सापळा रचून बसवराज हरिजन याला माधवनगर परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्याने विश्रामबाग व सांगली शहरातील चारही गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्‍पर अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी अजय कोकाटे आणि निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news