Sangli crime: सराईत गुंड टोल्यासह तिघेजण ताब्यात

चांदोलीत थरारक पाठलाग करून घेतले ताब्यात : सांगली शहर पोलिसांची कारवाई
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

सांगली : सांगली शहरातील राम मंदिर चौकातील पंचमुखी मारुती रस्त्यावर गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार टोल्या ऊर्फ प्रफुल्ल अरुण पोतदार (रा. सम्राट व्यायाम मंडळ, सांगली) याच्यासह तिघांना थरारक पाठलाग करून बेड्या ठोकल्या. सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली. टोल्या याच्यासह दिलावर ईलाही जमादार (रा. सम्राट व्यायाम मंडळ, सांगली) व सुधीर ऊर्फ कांचा माळी (रा. शामरावनगर, सांगली) यांना अटक केली.

संशयित टोल्या, दिलावर व कांचा हे राममंदिरजवळील पंचमुखी मारुती रस्ता परिसरात शुक्रवारी रात्री थांबले होते. त्यावेळी नीलेश प्रमोद जाधव आणि त्याचा आत्येभाऊ अजय माने हे तेथे आले. अजय हा टोल्या याच्या मुलाच्या वाढदिवसाला आला नव्हता. यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. वाद टोकाला गेल्यानंतर अजय माने याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी टोल्याने दिली व दिलावरच्या कमरेला लावलेले पिस्तूल काढत हवेत गोळी झाडली. त्याचवेळी दिलावर कोयता घेऊन आला. टोल्याने अजयच्या दिशेने पिस्तूल रोखले. त्यावेळी नीलेश त्यांना रोखण्यासाठी गेला. त्यावेळी नीलेशवर गोळीबार करण्यात आला. गोळी नीलेश याच्या गुडघ्याखाली लागून तो जखमी झाला.

पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी तातडीने पथक रवाना केले. टोल्या साथीदारांसह चांदोलीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला. यावेळी पोलिसांना पाहून टोल्या व त्याच्या साथीदारांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकाने थरारक पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

42 तासानंतर ठोकल्या बेड्या

गोळीबाराच्या घटनेनंतर टोल्या व त्याच्या साथीदारांनी पलायन केले. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली. त्यानंतर टोल्या पोतदारसह तिघांचा शोध सुरू झाला. पहिल्यांदा तो गोव्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मलकापूर याठिकाणी छापेमारी करण्यात आली. सलग 42 तास पोलिस टोल्याच्या मागावर होते. अखेर त्याला चांदोलीमधून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news