

मिरज : शहरातील मंगळवार पेठ येथे घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास मिरज शहर पोलिसांनी अटक केली. कैस मुबारक बोजगार (वय २४, रा. मंगळवार पेठ, मिरज) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीतील १८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर, त्याचा साथीदार टिपू ऊर्फ सुलतान दिलावर जमादार (रा. झारी मशिदीजवळ, मिरज) हा पसार झाला आहे. या प्रकरणी ज्योती आमटे यांनी फिर्याद दिली होती.
फिर्यादी ज्योती आमटे या मूळच्या मंगळवार पेठ येथील परीट गल्लीत राहणाऱ्या आहेत. त्या सध्या मुंबईतील भायखळा येथे वास्तव्यास असल्याने त्यांचे मिरजेतील घर बंद होते. हीच संधी साधत सराईत चोरटा कैस बोजगार याने त्याचा साथीदार टिपू जमादार याच्यासह २६ ऑक्टोबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हे बंद घर फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील १८ हजार ४०० रुपये किमतीचे दागिने चोरून त्यांनी पलायन केले होते.
ज्योती आमटे या मुंबईतून मिरजेत परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याबाबत त्यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या चोरीचा छडा लावला आणि सराईत चोरटा कैस बोजगार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पसार साथीदाराचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी मिरज शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.