

सांगली : पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे सांगली जिल्ह्यातील भूजल पातळी यावर्षी सुमारे एक मीटरने वाढली आहे. सरासरीच्या तुलनेत गेल्या पाच वर्षातील हा उच्चांक आहे. भूजल पातळी सरासरी 2.89 मीटरवरुन आता 1.94 मीटर झाली आहे. यामुळे अनेक भागात विहिरी आणि बोअरवेल पाण्याने भरले आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. अतिवृष्टी, सखल भागांमध्ये पाणी झिरपण्याचे प्रमाण वाढल्याने भूजल पातळीत वाढ झाल्याची माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक सुजाता सावळे यांनी दिली.
जिल्ह्यात वर्षातून जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबरअखेर भूजल पातळीची मोजणी केली जाते. सप्टेंबरनंतर जिल्ह्यातील दहाही तालुक्यात विविध ठिकाणी असलेल्या 87 विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्व ठिकाणी पाणी पातळी वाढल्याने निदर्शनास आले. गेल्या पाच वर्षात यावर्षी सर्वाधिक भूजल पातळी वाढल्याचे दिसून आले. शिराळा तालुक्यात सर्वात अधिक भूजल पातळी वाढली असून, येथे 0.53 मीटर पातळी असून, सर्वात कमी तासगाव तालुक्यात 3.40 मीटर आहे.
मुसळधार पावसामुळे जमिनीमध्ये पाणी मुरते आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होते. यावर्षी पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत 20 टक्के अधिक पाऊस बरसला. त्यानंतर सुमारे महिनाभर अवकाळी पाऊस होत आहे. जमिनीखाली पाण्याचे पुनःर्भरण होत असल्यामुळे पाण्याची पातळी नैसर्गिकरीत्या वाढत आहे. यामुळे यावर्षी पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. विहिरी आणि बोअरवेल पूर्ण क्षमतेने भरले आहेत.