

शशिकांत शिंदे
सांगली : सततचा पाऊस आणि हवामानातील बदलांमुळे यंदा सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. प्रत्येकवर्षी साधारणतः एक ऑगस्टपासून द्राक्ष पिकाच्या छाटणीला सुरुवात होते. यंदा मात्र आतापर्यंत केवळ तीन टक्के क्षेत्रातील द्राक्ष बागांच्या पीक छाटण्या झाल्या आहेत. त्यामुळे द्राक्ष हंगाम जवळपास महिनाभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अर्थातच ग्राहकांना द्राक्षांची चव उशिराने चाखायला मिळणार.
आठ-दहा वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादक हैराण झाले आहेत. द्राक्षाची काढणी डिसेंबर ते मार्चदरम्यान होत असली तरी, द्राक्ष हंगामाची तयारी शेतकरी एप्रिल छाटणीपासून सुरू करतात. एप्रिलमध्ये खरड छाटणी घेतल्यानंतर मेच्या भरपूर सूर्यप्रकाशात काडी परिपक्व होत असते. यंदा मात्र मेमध्येच अवकाळी पाऊस सतत सुरू राहिला. तो दमदार बरसला. त्याशिवाय मान्सूनही लवकर सुरू झाला. जून आणि जुलैमध्येही ढगाळ वातावरण कायम राहिले. त्यामुळे द्राक्षाच्या काडीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही. परिणामी अनेक शेतकर्यांच्या बागेतील काडी परिपक्व झालेली नाही.
उत्पादक द्राक्षापासून चांगले पैसे मिळवण्याच्या हेतूने द्राक्ष छाटणी लवकर करतात. साधारणत: जुलैच्या अखेरपासून ही छाटणी सुरू होते. ऑगस्टअखेरपर्यंत 50 टक्के छाटणी पूर्ण होते. द्राक्षे लवकर बाजारात आणून जादाचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न शेतकर्यांचा असतो. त्याशिवाय डिसेंबर, जानेवारीत आखाती देशांत द्राक्षांना मोठी मागणी असते.
द्राक्षांचा हंगाम लांबल्याने द्राक्ष निर्यातीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत द्राक्षांची आवक उशिरा व एकाच वेळी झाल्यास द्राक्षांच्या दरावरही परिणाम होऊ शकतो. मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता आहे.
नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर आणि बीड हे महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनासाठी प्रमुख जिल्हे. नाशिक आणि सांगली विशेष प्रसिद्ध.