

सांगली : अफगाणिस्तान, चीन आणि इतर देशांमधून भारतात आयात होणाऱ्या बेदाण्यावर शंभर टक्के आयात शुल्क आकारण्यात यावे, अन्यथा यापुढे दिल्लीतील जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषण करू, असा इशारा द्राक्ष बागायदार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी दिला.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी बेदाणा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या वेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. द्राक्ष बागायदार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव पाटील म्हणाले की, या न्याय्य मागण्यांसाठी गेली तीन वर्षे आमचा सातत्याने संघर्ष सुरू आहे. आजचा आमचा जिल्हाधिकारी कार्यालयावरील हा तिसरा मोर्चा आहे. आमच्या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास यापुढे आम्ही थेट दिल्लीतील जंतर-मंतरवर बेमुदत उपोषण सुरू करू. या आंदोलनात देशभरातील द्राक्ष व बेदाणा उत्पादकांना सहभागी करून घेतले जाईल.
निवेदनात म्हंटले आहे की, अफगाणिस्तान, चीन व इतर देशांतून आयात होणाऱ्या बेदाण्याचा किमान ३०० रुपये बेस रेट ठरवून त्यावर १०० टक्के आयात शुल्क आकारण्यात यावे. चीनमधून आयात होणाऱ्या द्राक्षांवर सध्या ३० टक्के आयात शुल्क आहे; मात्र त्यांचा बेस रेट किमान १५० रुपये ठरवून त्यावर १०० टक्के आयात शुल्क लावावे, यासह विविध मागण्या करण्यात आल्या. मोर्चाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून झाली. वालचंद कॉलेजमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. या आंदोलनात मारुती चव्हाण, तुकाराम माळी, बाळासाहेब गडद (नाशिक), शंकर इंग्रुळे (सोलापूर), प्रदीप पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.