

सांगली ः जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, दि. 2 पासून जिल्हाभरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी असहकार आंदोलन जाहीर केले आहे. तसेच दि. 10 मार्चपासून सुरू होणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बहिष्काराचा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रशासनाला मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे, त्यात म्हटले आहे की, प्रशासनाकडून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवताना दबावतंत्राचा वापर केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून धमकी व दडपशाहीचा वापर सुरु आहे. बैठकांमध्ये असभ्य भाषा वापरून मानसिक खच्चीकरण केले जात आहे, अशा दबावतंत्राखाली काम करणे आम्हाला शक्य नाही. यासंदर्भात वारंवार कल्पना देऊनही प्रशासनाच्या वर्तणुकीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळेच सोमवारपासून असहकार आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत अधिकारी कामावर येतील, मात्र प्रशासनाला कोणताही अहवाल किंवा दैनंदिन माहिती देणार नाहीत असे संघटनेने म्हटले आहे.
ग्रामपंचायत अधिकारी कामच करत नाहीत असा प्रशासनाचा आक्षेप असेल, तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सांगली जिल्हा परिषद राज्यात अव्वल कशी आली? कामे प्रलंबित राहत असतील, तर ई-ऑफिस प्रणालीत जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक कसा मिळविला, असे प्रश्न उपस्थित करण्यत आले आहे. सांगलीत दि. 10 मार्चपासून क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्या आहेत. मात्र वरिष्ठांकडून सातत्याने दबावतंत्र व धमक्या दिल्या जात असतील, तर खेळामुळे ताण कमी होणार नाही अशीही भूमिका ग्रामपंचायत अधिकारी संघाने घेतली आहे. यामुळेच क्रीडा स्पर्धांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.