Sangli News : गरीब मुलींच्या शिक्षणासाठीचे वसतिगृह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ताब्यात

नागनाथअण्णांच्या सामाजिक कार्याचा वसा हरवला
Savitribai Phule Girls' Hostel
गरीब मुलींच्या शिक्षणासाठीचे वसतिगृह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ताब्यात
Published on
Updated on

धन्वंतरी परदेशी

वाळवा : गोरगरिबांच्या मुलींनी शिक्षण घ्यावे या उदात्त हेतूने क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी वाळवा येथे उभारलेले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले 200 मुलींचे वसतिगृह आज नेमके कोठे हरवले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या ठिकाणी आता बी-फार्मसी आणि डी-फार्मसीसारखे हजारो रुपये फी घेणारे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे गरीब मुलींच्या शिक्षणाला प्रत्यक्षात खीळ बसली आहे.

महात्मा फुले यांच्या अपूर्ण राहिलेल्या 200 मुलींच्या वसतिगृहाच्या संकल्पनेवरून प्रेरणा घेत अण्णांनी हा उपक्रम उभारण्याचा निर्धार केला होता. सोलापूर येथील महिला वसतिगृहाची पाहणी करून त्यापेक्षाही अधिक सुसज्ज वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या ठिकाणच्या अधीक्षिकांच्याहस्ते भूमिपूजन करून कामाला वेग देण्यात आला. शेतकऱ्यांनी उसाच्या उत्पन्नातून योगदान देत हे स्वप्न साकार केले. तीन मजली भव्य इमारतीत 200 मुलींसाठी मोफत निवास व भोजनाची सुविधा होती. ‌‘शिकण्याची जिद्द हीच फी‌’ या तत्त्वावर राज्यभरातून मुली येथे येऊन शिक्षण घेत होत्या. या वसतिगृहाचे उद्घाटन त्यावेळच्या खासदार फुलनदेवी यांच्या हस्ते झाले होते आणि देशभर या उपक्रमाची चर्चा झाली होती. मात्र अण्णांच्या नंतर परिस्थितीत मोठा बदल झाला. वसतिगृहाची दुरवस्था होत गेली आणि फी परवडत नसल्याने गरीब मुलींची ये-जा बंद झाली. अखेर ज्या भावनेने हे वसतिगृह उभारले गेले होते, तेच बंद पडले. त्याच इमारतीत आता बी-फार्मसी आणि डी-फार्मसी अभ्यासक्रम सुरू असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात आहे.

इमारतीवरचा जुना वसतिगृहाचा फलक आजही जीर्ण अवस्थेत दिसतो, तर त्याखालील नवीन अभ्यासक्रमांचे चकचकीत फलक वेगळेच वास्तव दर्शवतात. या बदलामुळे क्रांतिवीर नागनाथअण्णा यांच्या सामाजिक कार्याचा वारसा केवळ इतिहासजमा होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news