

सांगली : पुढारी वृत्तसेवा
पीडितेने दाखल केलेल्या गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या संशयिताने तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आपल्याशीच लग्न करावे, यासाठी तिच्यावर दबाव आणून धमकी दिली आहे. याप्रकरणी पीडितेेने सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित मोईन सिराज नदाफ (रा. कवठेएकंद, ता. तासगाव) याच्याविरुध्द बलात्कार, विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडितेच्या दुबळेपणाचा फायदा घेत मोईन याने तिला आपल्या जाळ्यात ओढले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने संशयित मोईनविरोधात मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मोईनवर कारवाई केली. या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा पीडितेला त्रास देण्यास सुरुवात केली. मार्च 2024 मध्ये पीडिता खरेदीसाठी सांगलीत आल्याचे समजताच संशयित मोईन याने तिला गाठले. तू माझ्यावर गुन्हा का दाखल केलास, तो गुन्हा मागे घेऊन माझ्याबरोबर बोलावेच लागेल, असे धमकावले.
तू तसे केले नाहीस तर तुझे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करीन अशी धमकी दिली. त्या आक्षेपार्ह फोटोंची भीती घालून संशयिताने तिला नदीकाठी, आमराईत आपल्याबरोबर येण्यास भाग पाडून तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यानंतर कोल्हापूर रोडवरील एका लॉजवर येण्यास तिला भाग पाडून दि. 19 जुलै 2024 रोजी तिच्यावर बलात्कार केला. तू कोणाशीच लग्न करायचे नाही. तू लग्न केले तर तुझ्या होणार्या पतीला हे फोटो आणि व्हिडीओ दाखवणार आहे, अशी धमकी दिली आहे, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून संशयित मोईन नदाफविरोधात बलात्कार, विनयभंग, अॅट्रॉसिटी कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.