

सांगली ः सांगलीसह जिल्ह्यात तीन वर्षांत 86 हजार 614 जणांचा जन्म झाला आहे. यामध्ये 45 हजार 641 बालके आणि 40 हजार 973 बालिका आहेत. 2022-23 मध्ये एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 897 होते. 2023-24 मध्ये हे प्रमाण 899 झाले होते, तर 2024-25 मध्ये जन्मदर पुन्हा 897 झाला. तीन वर्षांची तुलना केल्यास, मुलींचा जन्मदर स्थिरच असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
पिढ्यान् पिढ्या ‘मुलगा हाच वंशाला दिवा’ ही मानसिकता आहे. यामुळे मुलींचे प्रमाण कमी झाले होते. परिणामी आजही मुलांच्या लग्नाबाबत अनेक अडचणी येत आहेत. काही वर्षांपासून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली. सध्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘सुकन्या’, ‘लेक लाडकी’ अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. दुसर्या बाजूला प्रसूतिपूर्व लिंगनिदान बंदी कायदा कडक करण्यात आला आहे. याचा मुलींच्या जन्मदरात वाढ होण्यास फायदा होत आहे.जिल्ह्यात 2022-23 या कालावधीत खासगी आणि सरकारी रुग्णालयांत 27 हजार 106 बालकांचा जन्म झाला आहे. यामध्ये 12 हजार 815 बालिका आहेत. त्यावर्षी हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर 897 इतका होता. तसेच 2023-24 या वर्षात 28 हजार 259 जणांचा जन्म झाला. यात 14 हजार 879 बालके आणि 13 हजार 380 बालिका आहेत. त्यावर्षी मुलींच्या जन्मदराच्या टक्क्यात काहीशी वाढ झाली. एक हजार मुलांमागे 899 मुलींचा जन्म झाला. 2024-25 मध्ये 31 हजार 249 बालकांनी जन्म घेतला. त्यावर्षी 16 हजार 471 बालके आणि 14 हजार 779 बालिकांचा जन्म झाला. तीन वर्षांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर 898 इतका आहे.
शिक्षण आणि जनजागृतीमुळे आई-वडिलांच्या मानसिकतेत बदल होताना दिसत आहे. यामुळे मुलींचा जन्मदर स्थिर होत आहे. अनेक पालक नोकरी, व्यवसाय करण्यासाठी मुलींना पाठबळ देत आहेत. आज डिजिटलच्या युगात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांत मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. शासन आणि प्रशासन यांनी अशीच जनजागृती चालू ठेवली, तर हजार मुलांमागे एक हजार मुली, असे प्रमाण एक दिवस होऊ शकेल, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले.