

तासगाव : शक्तिपीठ महामार्गाच्या सीमांकनासाठी सलग दुसर्या दिवशी गव्हाण (ता. तासगाव) येथे आलेल्या अधिकार्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना, नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समिती आणि शेतकर्यांनी अक्षरश: हाकलून लावले. यावेळी संघर्ष समितीच्या वतीने तहसिलदार अतुल पाटोळे यांना परत मोजणीसाठी गव्हाण येथे येऊ नका, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
मंगळवारी भर पावसात दिवसभर ठाण मांडून बसलेल्या शेतकर्यांनी गव्हाण येथील मोजणी बंद पाडली होती. यानंतर बुधवारी पोलिस बंदोबस्तामध्ये मोजणी करण्याची तयारी प्रशासनाने केली होती. सकाळीच मोजणी अधिकारी गावात दाखल झाले. सलग दुसर्या दिवशी अधिकारी मोजणीसाठी आलेले पाहून स्थानिक शेतकर्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना व नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. मोजणीसाठी आलेल्या सर्वच अधिकार्यांना विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सर्वांनी मिळून मोजणी अधिकार्यांना गाडीतून खाली उतरण्यास विरोध केला. यावेळी राज्य सरकार आणि मोजणी अधिकार्यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. शेतकर्यांचा विरोध पाहून मोजणी अधिकार्यांनी काढता पाय घेतला.
यावेळी नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गबाधित संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे, राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, सुभाष जमदाडे, रवी साळुंखे, दत्ता पाटील, सुनील कांबळे, सागर यादव, महादेव यादव, सुनील पाटील, प्रभाकर तोडकर, उमेश ऐडके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.