

सांगली : पंधरा दिवसांपासून गॅस सिलिंडर न मिळाल्याने संतप्त ग्राहकांनी संजयनगर येथील एका गॅस एजन्सीसमोर गोंधळ घातला. एजन्सीला कुलूप घालून कर्मचाऱ्यांनी पोबारा केल्याने चिडलेल्या ग्राहकांनी दगड घालून कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. संजयनगर पोलिसांनी हस्तक्षेप करून ग्राहकांची समजूत घातली. आजपासून (मंगळवार) गॅसपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन एजन्सीकडून देण्यात आले. त्यानंतर गर्दी पांगली.
महिन्यापासून प्रतीक्षा यादी साडेचार हजारांहून अधिक झाली आहे. चार दिवसांपासून गॅस मिळेल, असे एजन्सी सांगत आहे. सकाळपासून ग्रामीण भागातील ग्राहक रिकामे सिलिंडर घेऊन एजन्सीसमोर जमले; पण गॅसची गाडीच आली नाही, असे सांगितल्यानंतर ग्राहकांचा संयम सुटला. अनेकजण सकाळपासून जेवण न करता थांबून होते.