सांगली : महापालिकेतील उद्यान विभागातील बाग कामगारांना कामावर हजर करून घेण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी महापालिका कंत्राटी व मानधन कर्मचारी संघटनेच्यावतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. कामगारांनी टाळ वाजवत हे आंदोलन सुरू केले आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपाकडे उद्यान विभागातील शंभरहून अधिक कामगार अनेक वर्षांपासून ठेकेदारामार्फत उद्यान स्वच्छता, बागेची, झाडांची देखभाल, उद्यानाचे रखवालदार म्हणून काम करीत आहेत. ठेकेदाराने या कामगारांना आठ महिन्यांपासून बँक खात्याद्वारे पगार दिलेला नाही. आता आंदोलनानंतर केवळ 2 महिन्यांचाच पगार दिला आहे, तोही किमान वेतन कायद्याचे उल्लंघन करून ठराविक कामगारांच्या खात्यावर जमा केला आहे. या सर्व गैरव्यवहार व कामगारांच्या पिळवणुकीस उद्यान अधिकारी जबाबदार आहेत. ठेकेदाराने करारातील विविध अटींचा भंग केला आहे. कराराप्रमाणे कोणतेही साहित्य, सेवा पुरविली नाही, तरीही त्याचे बिल मनपाने अदा केले आहे. या सदोष निविदा प्रक्रियेमध्ये निविदा समितीमधील वरिष्ठ अधिकार्यांचा सहभाग आहे. आंदोलनामध्ये डॉ. कैलास पाटील, अॅड. सुजाता पाटील, आकाश माने, देवजी साळुंखे, अफझल मोमीन, कैलास आवळे, सागर टोळे आदी सहभागी झाले आहेत.