

Sangli Ganpati Sansthan Dispute Explainer : राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच सांगलीच्या ऐतिहासिक श्री गणपती पंचायतन संस्थानमध्ये एका आरतीवरून वाद उफाळला आहे. संस्थानचे विजयसिंहराजे पटवर्धन यांची कन्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी श्री गणपती पंचायतन संस्थानच्या श्रींच्या उत्सवमूर्तीच्या आगमन सोहळ्याच्या अगोदर मुख्य मंदिरात आरती केली. त्यांच्या या कृतीवर विजयसिंहराजेंनीच तीव्र संताप व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. शेकडो वर्षांची परंपरा मोडल्याचा आरोप करत सुरू झालेला हा वाद नेमका काय आहे? विजयसिंहराजेंनी आपल्याच कन्येने केलेल्या गणपती आरतीवर का नाराजी व्यक्त केली आणि गणपती पंचायतन संस्थानचा इतिहास काय सांगतो? जाणून घेऊया सविस्तर...
सांगलीचे ग्रामदैवत श्री गणेश आहे. येथील श्री गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. उत्तम वास्तुकलेचा नमुना म्हणून या मंदिराची प्रसिद्धी आहे. कोणताही नवा उपक्रम किंवा व्यवहार श्री गणेशाच्या दर्शनाशिवाय करायचा नाही, असा इथला रिवाज आहे. या संस्थानचे नावच श्री गणपती संस्थान (सांगली) असे आहे. येथे मुख्य गणपतीसह इतर चार छोटी मंदिरे आहेत, मध्यभागी श्री गणपती, आग्नेय दिशेला सूर्यनारायण, नैऋत्य दिशेला लक्ष्मीनारायण, वायव्य दिशेला चिंतामणेश्वर (शिव), ईशान्य दिशेला चिंतामणेश्वरी (पार्वती) म्हणून याला 'पंचायतन' म्हणतात.
सांगलीचे प्रसिद्ध श्री गणपती पंचायतन संस्थान हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक श्रद्धास्थान आहे. या भव्य मंदिराची निर्मिती सांगली रियासतचे शासक श्रीमंत थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी केली. मंदिराचे बांधकाम १८११ ते १८१३ च्या सुमारास सुरू झाले. सन १८१४ मध्ये मंदिराची पायाभरणी झाली. तब्बल ३० वर्षे काम चालून १८४५ मध्ये हे मंदिर पूर्ण झाले. सन १८४५ मध्ये चैत्र शुद्ध दशमी या मुहूर्तावर मुख्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिराच्या शिखराचे काम १८४७ मध्ये पूर्ण झाले.
गणपती पंचायतन संस्थानच्या मंदिरात गणेश चतुर्थीच्या दिवशी विजयसिंहराजे पटवर्धन यांची मुलगी व अभिनेत्री भाग्यश्री यांनी सकाळी मंदिरात जाऊन विधिवत पूजा व आरती केली. राजवाड्यातील दरबार हॉल येथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्यापूर्वी घडलेल्या घटनेवरून राजेसाहेबांनी तीव्र आक्षेप नोंदवला. संस्थानच्या जमिनी, मालमत्ता आणि कारभारावरून श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, त्यांची मुलगी (अभिनेत्री) भाग्यश्री पटवर्धन आणि जावई हिमालय दासानी यांच्यात तीव्र मतभेद झाले. २०१३ ते २०१६ या काळात विजयसिंहराजेंनी सुरुवातीला संस्थानच्या कारभाराची जबाबदारी भाग्यश्री यांचे पती हिमालय दासानी यांच्याकडे दिली होती. मात्र, जावयाने संस्थानच्या जमिनी परस्पर विकल्याचा आरोप करत राजेंनी २०१६ मध्ये त्यांचे सर्व अधिकार काढून घेतले.
२०१६ नंतर विजयसिंहराजे पटवर्धन यांनी स्वतः कारभार पाहिल्यानंतर, २०२१ मध्ये राजेंनी संस्थानचे व्यवस्थापन जयदीप अभ्यंकर यांच्याकडे सोपवले. त्यांच्याच मुलाला (आदित्य) दत्तक घेतले. विजयसिंहराजेंना भाग्यश्री यांच्यासह तीन मुली आहेत. कौटुंबिक मालमत्ता आणि संस्थानावरील हक्कावरून भाग्यश्री व त्यांच्या पतीचा या दत्तक प्रकरणाला आणि कारभाराला विरोध राहिला आहे.
माध्यमांशी बोलताना विजयसिंहराजे पटवर्धन यांनी स्पष्ट केले की, "उत्सवमूर्तीची पूजा करण्याचा मान माझा आणि राणीसाहेबांचाच आहे. माझा मान डावलून भाग्यश्री हिमालय दासानी यांनी माझ्या अनुपस्थितीत आरती का केली? आणि यामागे काय राजकारण आहे, हे मला माहीत नाही. 'मी मुलगी आहे, काहीही करू शकते,' असा अविर्भाव कोणीही बाळगू नये."
आरतीचा मान ही एक शेकडो वर्षांची परंपरा आहे. ती मोडून चालणार नाही. सांगलीकरही हे खपवून घेणार नाहीत. यावेळी राजेसाहेबांनी वारसा हक्काबाबत स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, ‘आदित्यराजे पटवर्धन यांनाच माझा व सांगली गादीचा वारस म्हणून सर्वांनी मान्य करावे. विनाकारण आदित्यराजेंच्या विरोधात कारस्थान करू नये,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.