सांगली : आटपाडी तालुक्यातील कुरुंदवाडीत जुगार अड्ड्यावर छापा, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : आटपाडी तालुक्यातील कुरुंदवाडीत जुगार अड्ड्यावर छापा, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Published on

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : कुरूंदवाडी (ता.आटपाडी) येथे वगरे वस्तीवरील जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलीसांनी तब्बल २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून अड्डा चालक अर्जुन गवंड आणि काहीजण पळून जाण्यात यशस्वी ठरले. या मोठ्या कारवाईने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, अप्पर पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांचे विशेष पथक शनिवारी सायंकाळी कुरुंदवाडीत दाखल झाले. झरे लगतच्या कुरुंदवाडी गावात सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वगरे वस्ती आहे.या वस्तीवर चवरे यांचे जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये अर्जुन गवंड रा. आटपाडी हा बेकायदेशीरपणे तीन पानी जुगाराचा अड्डा चालवत असल्याची खात्री पथकाने केली आणि तात्काळ छापा टाकला.खेळणाऱ्या व्यक्तींनी पत्त्याची पाने व रोख रक्कम टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला.परंतु पोलीसांनी त्यांना पकडले.

या कारवाईत मोहन लक्ष्मण खर्जे (वय ४४ रा.विभुतवाडी जि. सांगली), सुरज पांडुरंग घोलप (वय २२ रा. रहिमतपूर जि. सातारा), सचिन काशिनाथ माने (वय ४२ रा. काळचौंडी जि. सातारा), मारुती नागदेव मोटे (वय ४० रा. वरकुटे, जि. सातारा), शंकर मारूती फडतरे (वय ६९ रा. झिरे जि. सातारा), गणेश बाळाराम राठोड (वय ५० वर्षे रा.विभूतवाडी जि. सांगली), उमेश सोपान गुरव (वय ५७ रा. वडझर जि. सातारा), विष्णु रामा माने (वय ६५ रा. झरे जि. सांगली) यांना ताब्यात घेतले.

अंगझडती घेऊन त्यांच्याकडून १ लाख २१ हजार रुपयांची रोकड, पत्त्याची पाने, ५७ हजार ५०० रुपयांचे ११ मोबाईल, १८ लाख ५० हजारांची तीन चारचाकी वाहने, ५ लाख २० हजार रुपयांच्या ९ मोटारसायकल आणि ९७ हजार रुपयांचे अन्य साहित्य असा २६ लाख ४६ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पथकाने ताब्यात घेतलेले ८ आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी आटपाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला.

सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर सुरू असलेल्या या अड्डयावर विशेष पथकाने कारवाई केली.दुष्काळी भागातील या अड्ड्यावर आलिशान कार, मोटारसायकल,विजेची सोया आणि ग्राहकांच्या सोयीसाठी कुलर देखील ठेवण्यात आले होते.विशेष पथकाने छापा टाकत हा अड्डा उघडकीस आणला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news