

आटपाडी : नोकरीला लावण्यासाठी दिलेल्या पैशांच्या वादातून आणि पाटबंधारे विभागाच्या पाईपलाईन कामातील कथित निकृष्ट दर्जाबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिल्याच्या रागातून, गळवेवाडी (ता. आटपाडी) येथे एकाच कुटुंबातील तिघांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. तसेच फिर्यादीच्या अंगावर डंपर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत किसन अण्णा गोडसे (वय ४३, रा. गळवेवाडी) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गोडसे यांच्या घरासमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. फिर्यादी गोडसे यांचा मुलगा सुदाम याला नोकरी लावण्यासाठी दोन वर्षांपूर्वी दिलेले सात लाख पन्नास हजार रुपये परत मिळाले नसल्याचा वाद होता. तसेच पाटबंधारे विभागाच्या पाईपलाईन कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिल्याचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी नंदकुमार वसंत गळवे, रोहित हिंदुराव गळवे, हिंदुराव वसंत गळवे, स्वप्निल नंदकुमार गळवे, विवेक हिंदुराव गळवे, वसंत बापू गळवे आणि त्यांच्यासोबत आलेल्या आठ ते दहा अनोळखी कामगारांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.
संशयितांनी किसन गोडसे, त्यांचा मुलगा सुदाम आणि पत्नी जयश्री यांना लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच किसन गोडसे यांच्या अंगावर डंपर घातल्याने त्यांचा डावा हात डंपरच्या चाकाखाली आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.