

सांगली : पेट्रोल व डिझेलचे सुरक्षित वितरण व्हावे तसेच अवाजवी साठा रोखण्यासाठी जिल्हास्तरावरील दक्षता व फिरते पथकांकडून तपासण्या सुरु आहेत. सध्या जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल, डिझेल व एलपीजीचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली.
सध्या (शुक्रवारी) जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल व डसाठा उपलब्ध आहे. एचपीसीएल कंपनीचा पेट्रोल 650 किलो लिटर व डिझेल 800 किलो लिटर, बीपीसीएल कंपनीचा पेट्रोल 760 किलो लिटर व डिझेल 850 किलो लिटर आणि आयओसीएल कंपनीचा पेट्रोल 1530 किलो लिटर व डिझेल 1580 किलो लिटर इतका साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. ग्राहकांनी पेट्रोल व डिझेल पंपावर अनावश्यक गर्दी करणे टाळावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
त्याचबरोबर जिल्ह्यात एलपीजीचाही पुरेसा साठा आहे. एचपीसीएल कंपनीचा 1355 मेट्रिक टन, बीपीसीएल कंपनीचा 138.1 मेट्रिक टन आणि आयओसीएल कंपनीचा 52 मेट्रिक टन इतका साठा असून आणखी 2344.9 मेट्रिक टन एलपीजी साठा जिल्ह्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे.