

सांगली : फळे खरेदी करून घरी परतणाऱ्या एका ६४ वर्षीय व्यापाऱ्याला गाठून आपण पोलिस असल्याचे भासवून ७२ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लांबवल्याची धक्कादायक घटना सांगली शहरात घडली. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विष्णुअण्णा फळ मार्केट ते सांगली बस स्टँड रस्त्यावर हा प्रकार घडला.
याबाबत पुरुषोत्तम लालजी पटेल (वय ६४, रा. पूनम फर्निचरजवळ, टिंबर एरिया, सांगली) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पटेल हे दुचाकीवरून विष्णुअण्णा फळ मार्केट येथे फळे खरेदीसाठी गेले होते. तेथून परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी त्यांना थांबवून आपण पोलिस असल्याची बतावणी केली. भामट्यांनी त्यांचा विश्वास संपादन करून, गळ्यातील रुद्राक्ष पेंडंट असलेली १२ ग्रॅम वजनाची व ७२ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन काढून घेण्यास सांगितली आणि ती चलाखीने पळवून नेली.
याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.