सांगली; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची डॉग व्हॅन कुत्री पकडण्यासाठी फिरवली असल्याचे दाखवून खोट्या व बोगस नोंदी करून डिझेलचा अपहार करण्यात आलेला आहे. तसेच त्याची बिले सादर करून शासनाची 59 हजार 709 रुपयांची फसवणूक केली असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी सांगली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी कर स्वच्छता निरीक्षक ऊण सूर्यगंध, सफाई कामगार सिद्धार्थ यल्लाप्पा कांबळे, मानधन सफाई कामगार कुशल कुदळे, यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गंत काम करीत असलेले सूर्यगंध, कांबळे व कुदळे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून शासकीय कामात कसूर केलेली आहे. कोणतेही काम न करता त्याबाबत पगार बिले सादर करून शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे. दरम्यान, बोगस हजेरी भरणे, डॉग व्हॅन फिरली नसताना फिरल्याचे दाखवून इंधन घोटाळा, बोगस हजेरी भरून पगार काढणे याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांनी पोलिस व आयुक्त यांच्याकडे तीन वर्षापूर्वी तक्रार दिली होती.