

सांगली : येथील पटेल चौक परिसरातील टांगाअड्डा चौकाजवळील चारमजली व्यावसायिक इमारतीचे सहा इंच खासगी जागेतील अतिक्रमण पाडण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून सुरू झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने ही कारवाई सुरू केली.
या सहामजली इमारतीला 2016 मध्ये महापालिकेने बांधकाम परवाना दिला होता. मात्र, ही इमारत सहा इंच आपल्या जागेत आल्याची तक्रार डिसुजा यांनी महापालिकेकडे केली. महापालिकेच्या नगररचना विभागाच्या तत्कालीन शाखा अभियंत्याने अतिक्रमित जागेतील बांधकामासह परवानगी दिल्याचे समोर येताच महापालिकेने 2018 मध्ये इमारतीचा बांधकाम परवाना रद्द केला. त्यावर इमारत मालकाने न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली. दरम्यानच्या कालावधीत महापालिकेने ही इमारत सील केली. सप्टेंबर 2024 मध्ये न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर महापालिकेने जानेवारी 2025 मध्ये खासगी जागेतील अतिक्रमण पाडण्याच्या हालचाली सुरू केल्या.
अतिक्रमण करून उभारलेल्या 6 इंच जागेतील बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली. या अतिक्रमित जागेत भिंती, बीम, कॉलम आहेत. त्यापैकी प्रथम भिंती पाडण्यात आल्या. दरम्यान, बीम व कॉलम पाडल्यामुळे इमारत कमकुवत होणार असल्याने पर्यायी उपाययोजना कराव्यात. पर्यायी बीम, कॉलम उभारावेत, असे इमारत मालकाला कळवले. मात्र, इमारत मालकाकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता अतिक्रमित 6 इंच जागेतील बीम, कॉलमही पाडण्यास सुरुवात केली आहे, असे महापालिकेतून सांगण्यात आले. दरम्यान, ही चारमजली संपूर्ण इमारत पाडली जाणार की केवळ 6 इंच अतिक्रमित जागेतील सर्व बांधकाम पाडले जाणार, याकडे लक्ष लागले आहे.