

सांगली : दंड कमी करण्याच्या कारणावरून व कामगारांच्या हजेरी बद्दल वाद घालून बांबूच्या काठीने मारहाण करून रेल्वे अधिकाऱ्यास जखमी करून शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल चौघांना चार वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी ३ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम. एस. काकडे यांनी सुनावली.
प्रमोद भरत डुचाळ (पाटील), इरफान बाबू अत्तार (दोघेही रा. मुंडेगाव, कराड, जि. सातारा), महेश महावीर म्हेत्रे, मिथून लक्ष्मण पोटकुले (दोघेही रा. मिरज), अशी दोषींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना भारतीय दंड संहिता कलम ३२३ नुसार प्रत्येकी एक हजार रुपये दंड, तसेच कलम ३५३ नुसार प्रत्येकी १ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, तसेच कलम ३३३ नुसार ४ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
फिर्यादी संजीवकुमार श्रवणकुमार हे मिरज रेल्वे येथे हेल्थ इन्स्पेक्टर पदावर कार्यरत होते. त्यांचे वरिष्ठ मुख्य आरोग्य निरीक्षक नंदन गरीया हे होते. मिरज रेल्वे स्थानकावर साफसफाईचे कंत्राट ॲपकॉन इंडीया कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीतर्फे प्रमोद डुचाल हा साफसफाईचे काम करीत होता, तर महेश म्हेत्रे व मिथुन पोटकुले हे त्यांच्या हाताखाली सुपरवायझर म्हणून कार्यरत होते, तर इरफान आत्तार हा प्रमोदचा ड्रायव्हर होता.
दि. ३० मार्च २०१८ रोजी फिर्यादी त्यांच्या कार्यालयात शासकीय कर्तव्यावर असताना, वरील संशयितांनी एकत्र येऊन फिर्यादीबरोबर दंड कमी करण्याची मागणी, तसेच कामगारांच्या हजेरीबाबत हुज्जत घातली. प्रमोद डुचाल याने फिर्यादीच्या अंगावर धावून जात लोखंडी पाईपने चेहऱ्यावर व डाव्या भुवईजवळ वार केला. त्यामध्ये फिर्यादीचे नाकाचे हाड फॅक्चर झाले. यावेळी महेश व मिथुन यांनी बांबूच्या काठीने फिर्यादीस लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. घटनास्थळी नंदन गरीया यांनी तात्काळ हजर राहून फिर्यादीस मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. फिर्यादीने दवाखान्यात असताना संशयितांविरुध्द मिरज रेल्वे पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली. खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीदरम्यान फिर्यादी, नंदन गरीया, डॉक्टर व पंचाची साक्ष महत्वाची ठरली.