

श्रीकांत मोरे
कुपवाड : आखाती देशांतील युद्धामुळे कच्च्या मालाचे दर कडाडल्याने आणि एलपीजी गॅस महागल्याने कुपवाड, मिरज, सांगली औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्यातील फाैंड्री उद्योग तीव्र आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच कुशल व अकुशल कामगारांची मोठी टंचाई भासत असल्याने कारखानदारांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.
जानेवारी २०२६ पूर्वी फाैंड्री उद्योगाला लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर स्थिर होते. मात्र, फेब्रुवारी २०२६ मध्ये आखाती देशांत सुरू झालेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात धातू आणि इंधनाचे दर भडकले. फाैंड्री उद्योगाचा कणा असलेले फाैंड्री ग्रेड पिग आयर्न, बिडाचे व पोलादाचे भंगार, कोकिंग कोळसा, रेझिन आणि विविध रसायनांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. तसेच धातूला विशिष्ट ताकद, कठीणपणा आणि गंजरोधक गुणधर्म देण्यासाठी वापरले जाणारे फेरो-सिलिकॉन, फेरो-मॅंगनीज आणि फेरो-क्रोमियमही महागले आहेत.
कच्च्या मालासोबतच औद्योगिक एलपीजी गॅस आणि ऑईलचे दरही वाढले आहेत. कास्टिंग गरम करण्यासाठी आणि उष्णता प्रक्रियेसाठी गॅस अत्यंत आवश्यक असतो. या दरवाढीमुळे जिल्ह्यातील हजारो लहान-मोठ्या उद्योजकांचे बजेट कोलमडले आहे. कुपवाड, मिरज आणि सांगली औद्योगिक वसाहतींतून ऑटोमोबाईल पार्ट्स, कृषी पंप आणि इंजिनचे सुटे भाग मोठ्या प्रमाणावर तयार होऊन देश-विदेशात पाठवले जातात. मात्र, सागरी वाहतूक भाड्यात वाढ झाल्याने निर्यातीलाही फटका बसत आहे. दुसरीकडे कच्च्या मालाचे दर वेगाने वाढूनही मोठ्या कंपन्यांकडून तयार कास्टिंगच्या दरात तत्काळ वाढ मिळत नसल्याने उद्योजक दुहेरी कात्रीत सापडले आहेत.
मनुष्यबळाची तीव्र टंचाई
वाढत्या महागाईसोबतच फाैंड्री व इतर उद्योगांना मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. यामध्ये मशीन ऑपरेटर, वेल्डर, फिटर, भट्टी ऑपरेटर, पॅटर्न मेकर, अनुभवी मोल्डर, मशीन हेल्पर, फेटलिंग व ग्राइंडिंग कामगार, मदतनीस, क्वालिटी कंट्रोल इंजिनिअर, स्टोअर कीपर, अकाउंटंट आणि एचआर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित होऊन कच्च्या मालाचे दर लवकरात लवकर स्थिर व्हावेत, अशी अपेक्षा उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे.