

देवराष्ट्रे : कडेगाव तालुक्यातील शिरसगाव-सोनकिरे-चिंचणी व तडसर हद्दीतील डोंगराला लागलेल्या आगीमध्ये जवळपास 350 एकर क्षेत्र जळून खाक झाले आहे. जळालेल्या या डोंगरावर घरटी शोधण्यासाठी सोमवारी पक्ष्यांच्या घिरट्या सुरू होत्या. घरटी सापडत नसल्याने पक्ष्यांचा किलबिलाट मन सुन्न करणारा होता. शनिवारी व रविवारी या परिसरात लागलेल्या आगीमध्ये प्रादेशिक वन विभागासह खासगी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. प्राणी व पक्ष्यांना मोठा फटका बसला आहे. आगीतून जीव वाचवण्यासाठी हरणांची सुरू असलेली धडपड काळीज पिळवटून टाकणारी होती. पक्षीप्रेमींनी प्राणी व पक्ष्यांची काही जीवित हानी झाली आहे का, याची माहिती घेतली.
शनिवारी तडसरच्या बाजूने लागलेली आग चिंचणीकडे सरकत होती. यावेळी प्राणीमित्र महेश पाटील व त्यांच्या सहकार्यांनी डोंगराकडे धाव घेतली. जवळच असलेल्या वस्तीवर काही युवकांसमोरून बिबट्या गेल्यावरही मागे न फिरता त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी डोंगराकडे धाव घेतली.
डोंगराला लागलेल्या भीषण आगीमध्ये परिसरातील गवत व खुरटी झाडे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे यापुढील काही महिने या परिसरातील शेतीचे मोकाट प्राण्यांपासून नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
अंधार, बिबट्याचे दर्शन, डोंगर आणि आगीच्या ज्वाळा समोर असतानाही वनसंपदा वाचवण्यासाठी चिंचणी व परिसरातील युवकांनी शर्थीचे प्रयत्न केले. यामध्ये महेश पाटील, धनाजी महाडिक, इक्बाल मुल्ला, इंद्रजित महाडिक, उदय पाटील, प्रमोद जाधव, राजेंद्र पाटील, विनोद महाडिक, अक्षय नलवडे, कुलदीप औताडे, अविनाश माने, गणेश नलवडे, अनिकेत जाधव यांच्यासह युवकांनी सहभाग घेतला.