

शिराळा : तालुक्यात वारणा नदीचे पाणी वाढत आहे. आरळा येथील बाजारपेठेत पाणी शिरले असून काळूंद्रे, उबाळे वस्ती, तसेच मणदूरमध्ये पाणी शिरले आहे. वारणा व मोरणा नदीला पूर आला असून नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.
सोनवडे ते चांदोली रस्त्यावर रात्री पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. खुंदलापूर येथे दरड कोसळून वाहतूक बंद झाली होती, ती पूर्ववत करण्यात आली. शिराळ्याहून शाहूवाडीकडे जाणारे सर्व पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील सात पूल पाण्याखाली गेले आहेत. तालुक्यातील नदीकाठाच्या गावांना तसेच सोनवडे, आरळा, काळूंद्रे या गावांना आमदार सत्यजित देशमुख, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, उपअधीक्षक अरुण पाटील, निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, तहसीलदार शामला खोत-पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले की, पूरस्थितीबाबत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. शिराळा आगारातील शिराळा-बांबवडे, शिराळा-कांडवण, शिराळा-खुंदलापूर या मार्गांवरील बसेस बंद करण्यात आल्या आहेत.