

सांगली : सांगलीत कृष्णा नदीचा पूर ओसरू लागला आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजता आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 38 फूट 2 इंच होती. मात्र पूरग्रस्त वस्त्या अजूनही जलमय आहेत. पाणी ओसरल्यानंतर महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिर घेतले जाणार आहे. दरम्यान, पावसाने उघडीप घेतल्याने व धरणांमधून विसर्ग थांबल्याने पूरग्रस्तांना आता घराकडे परतीची आस लागली आहे.
सांगलीत गुरुवारी रात्री कृष्णेची पाणी पातळी 43 फूट 6 इंच झाली होती. पाणी पातळी आठ तास स्थिर होती. शुक्रवारी पहाटे तीन वाजता 43 फूट 5 इंच झाली. शुक्रवारी सायंकाळी पाणी 40 फुटापर्यंत खाली आले. रात्री 9 वाजता पाणी पातळी 38 फूट 2 इंच होती. कोयना, चांदोली धरणांचे दरवाजे बंद केल्याने विसर्ग पूर्णपणे थांबला आहे. पावसानेही उघडीप दिली आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. शनिवारी सकाळपासून पाणी वेगाने उतरेल. दुपारी पाणी नदीपात्रात येईल. म्हणजे त्यावेळी पाण्याची पातळी सुमारे 35 फुटादरम्यान असेल, असा अंदाज सांगली पाटबंधारे विभागाकडून व्यक्त करण्यात आला.
सांगलीतील पूरस्थितीत हळूहळू सुधारणा होत आहे. मात्र पूरपट्ट्यातील वस्त्या अजूनही जलमय आहेत. सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट (शिवनगर), कर्नाळ रोड, पटवर्धन कॉलनी, काकानगर, दत्तनगर, साई कॉलनी व बायपास रस्ता परिसरात अजूनही पुराचे पाणी आहे. मगरमच्छ कॉलनीतील पाणी ओसरू लागताच महापालिकेने तिथे स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. पाणी 30 फुटाच्या खाली गेल्यानंतर सर्व वस्त्यांमधील पाणी ओसरते. नागरी वस्त्यांमधील पाणी ओसरल्यानंतर सर्व भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. औषध फवारणी, औषध धुरळणीही केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त सचिन सागावकर यांनी केली.
दरम्यान, पूरग्रस्त घरांमध्ये परत गेल्यानंतर जलजन्य आजार, कीटकजन्य आजार याबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. रुग्ण शोधून उपचार केले जाणार आहे. पाणी नमुने, रक्त नमुने तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली.
शहरातील नदीकाठच्या 169 कुटुंबांतील 849 व्यक्तींनी स्थलांतर केलेले आहे. त्यापैकी 196 पूरग्रस्त महापालिकेच्या निवारा केंद्रात आहेत. मार्केट यार्डातील सहकार भवन येथे हे निवारा केंद्र सुरू आहे. दरम्यान, पूर ओसरू लागल्यामुळे स्थलांतरित नागरिकांना आता घराकडे परतीची आस लागली आहे. वस्त्यांमधील पाणी पूर्ण ओसरून स्वच्छता झाल्यानंतरच त्यांना घराकडे परतू दिले जाणार आहे.
महापुरामुळे फक्त पाणीच घरात शिरत नाही तर पाण्यासोबत मगरी, साप, उंदीरही घराच्या अंगणापर्यंत येत आहेत. महापुरामुळे नदीकाठची शेती पाण्याखाली गेल्याने मगरींचा रहिवास धोक्यात आला आहे. पाणी साठलेल्या ऊस शेतीत तर कधी बांधापर्यंत मगरी आल्या आहेत. नदीकाठच्या गवतातही मगरी दिसत आहेत. मगरींसोबत नदीकाठावर असलेले साप, नाग, विषारी-बिनविषारी सर्पही घराच्या आवारात दिसायला लागले आहेत. अगोदरच दलदल, काटेरी झुडपांमध्ये महापुराचे पाणी साचल्याने हे साप बिनधास्त फिरत आहेत.