

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. कोयना व चांदोली धरणातून विसर्ग वाढवल्याने वारणा, कृष्णा नद्यांचे पाणी पात्रा बाहेर पडले आहे. पाणी पातळी आणखीन वाढली तर कणेगाव भरतवाडी गावात पाणी शिरण्याचा धोका आहे. बहे, बोरगाव, चिकुर्डे, नागठाणे येथील बंधारे तर ऐतवडे खुर्द येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. कृष्णा नदीवरील ताकारी पुलालाही पाणी लागल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
काही दिवसांच्या उघडीपीनंतर सोमवारपासून (दि.१८) तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात शेतातून पाणी साचून राहिल्याने खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. धरण पाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टी होत असल्याने कोयना व चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वारणा व कृष्णा नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.
कृष्णा नदीवरील बहे, बोरगाव, नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला आहे. तर वारणा नदीवरील चिकुर्डे बंधारा तसेच ऐतवडे खुर्द येथील कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा पुलही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर तरकारी पूलालाही पाणी लागल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळपासून बंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदी काठावर पूर परिस्थिती उद्भभवू शकते. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूर परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असल्याचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.