

सांगली : महाराष्ट्र शासनाने कर्नाटकशी समन्वय राखून संयुक्त महापूर व्यवस्थापन केल्याने गेल्या चार वर्षांपासून सांगली आणि कोल्हापूरला भेडसावणारा महापूर थांबला होता; पण आता कर्नाटकने या महापुराला पुन्हा एकदा आमंत्रण देण्याचा घाट घातलेला दिसत आहे.
कर्नाटकला पाण्याची हाव!
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाने प्रचंड विरोध करूनही कर्नाटकने अलमट्टीची उंची वाढविण्याचा आपला हट्ट सोडलेला नाही. उंची वाढविण्यासाठी केंद्र शासनाने अद्याप परवानगी दिली नसली, तरी कर्नाटकचा त्यासाठी आटापिटा सुरूच आहे. पहिल्या टप्प्यात कर्नाटकने त्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण केले आहे. आता चोरीछुपे उंची वाढविण्याचा घाट घातलेला दिसत आहे.
‘अलमट्टी’वर प्लेट्स बसविल्यास होणारे परिणाम...
अलमट्टी धरणाची पाणी साठवण क्षमता 123 टीएमसीवरून थेट 186 टीएमसीपर्यंत वाढणार.
अलमट्टीतील पाणीसाठा वाढेल तसा कोल्हापूर, सांगलीतील बॅकवॉटरचा प्रभाव आणखी वाढत जाणार.
कोल्हापूर, सांगलीतील महापुराची पातळी आणखी किमान चार ते पाच फुटाने वाढत जाणार.
महाराष्ट्र-कर्नाटक संयुक्त महापूर व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजण्याचा फार मोठा धोका निर्माण होणार.
राज्याने या उपाययोजना करण्याची आवश्यकता...
कर्नाटकची आगळीक केंद्रीय जल आयोगाच्या निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता.
संयुक्त महापूर व्यवस्थापन आणखी सूक्ष्म पातळीपर्यंत करण्यासाठी जलसंपदाला आदेश
देण्याची गरज.
कर्नाटक शासन जर आपला हेकेखोरपणा सोडणार नसेल, तर न्यायालयात आव्हान देण्याची आवश्यकता.
जागतिक बँकेने मंजूर केलेल्या महापूर नियंत्रण उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज.