सांगली : महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यासाठी 4 हजार कोटींचा फ्लड डायव्हर्शन प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण करणार आहोत. पुराचे पाणी सांगली, कोल्हापूर शहरांत न येता ते दुष्काळी भागाकडे वळवले जाईल. पहिल्या टप्प्यात 591 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्याचे काम सुरू होत आहे. सांगलीला पुरापासून नक्की वाचवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिले. शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 454 कोटी रुपयांची वारणा उद्भव पाणीपुरवठा योजना मंजूर केली जाईल, तसेच सांगलीत आयटी इंडस्ट्री आणू, कवलापूरला विमानतळ उभारू, ट्रक टर्मिनस, महापालिकेची नवीन इमारत उभारू, असेही ते म्हणाले.
सांगली महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या प्रचाराचे रणशिंग शनिवारी येथे फुंकले. येथील स्टेशन चौकात त्यांची जाहीर प्रचार सभा झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. अतुल भोसले, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. सत्यजित देशमुख प्रमुख उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर आला, त्यावेळी इथली परिस्थिती बघितली होती. या दोन शहरांची रचना अशी आहे, इथे वारंवार महापूर येऊन इथल्या जनजीवनावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाय काढण्याची नितांत गरज भासली.
त्यामुळे जागतिक बँकेच्या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याचा प्रकल्प मंजूर केला. 4 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात 591 कोटी रुपयांची कामे होतील. सांगलीला पुराच्या पाण्यापासून वाचवू. पुढच्या काळात पुराचे पाणी शहरात न येता पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळी भागाकडे वळवले जाईल. एकीकडे आपल्या शहरांना पुरापासून संरक्षण मिळेल आणि दुसरीकडे त्या पाण्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना जीवनदान मिळेल.
ते पुढे म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी महानगरपालिकांच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ मी सांगलीतून करत आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. एकदा सांगलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यांनी सांगितलं होतं की, सांगली सर्वात चांगली आहे. त्यामुळे मी ठरवलं की, महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ जरी सायंकाळी मुंबईमध्ये होणार असला तरी, भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ सांगलीपासून करायचा. सांगलीच्या नागरिकांनी महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपला विजयी केले. त्यानंतर दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीलाच 100 कोटींचा निधी देऊन अनेक कामे मार्गी लावली.
भाजपचा झेंडा फडकवा; नवी इमारत उभारू
सांगली शहराची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेतली आहे. 454 कोटी रुपयांच्या वारणा उद्भव योजनेचा प्रस्ताव मंत्रालयात आला आहे. सांगलीतल्या प्रत्येक घरामध्ये नळ सुरू केल्यावर पिण्याचे पाणी पोहोचले पाहिजे, याकरिता या योजनेलाही मान्यता देण्यात येईल. सांगली महानगरपालिकेची इमारत जुनी झाली आहे. महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा. महानगरपालिकेला नवीन इमारतीसाठी तत्काळ निधी देऊ. कुठल्याच कामामध्ये पैशाची कमतरता राहणार नाही. हे शहर आपल्याला आधुनिक शहर तयार करायचे आहे. नाल्यांचे पाणी नदीत मिसळू नये, यासाठी शेरीनाला प्रकल्प योजना मंजूर करू. इथे घनकचरा प्रकल्प सुरू आहे. या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्या माध्यमातून खत निर्मिती करायची आहे. कोळशासारखे पॅलेट करून वीज निर्मिती करायची आहे. शहर स्वच्छ, सुंदर करण्यासाठी काम करायचे आहे. त्यासाठी भाजपला विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
आयटी इंडस्ट्री, विमानतळ, ट्रक टर्मिनल, म्युझिक हेरिटेज पार्क..!
सांगलीचे तरुण, तरुणी पुण्यामध्ये आयटी इंडस्ट्रीमध्ये जातात. आता आयटी इंडस्ट्री सांगलीत आणू. कवलापूरला विमानतळ व्हावे, ही अनेक वर्षांची मागणी आहे. मध्यंतरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांनी कवलापूर विमानतळासाठी माझ्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला. त्याचा परिणाम म्हणून कवलापूरला विमानतळ तयार करण्याकरिता प्री-फिजिबिलिटी अभ्यासाकरिता कन्सल्टंट नियुक्त केला आहे. त्यांचा अहवाल प्राप्त होईल. विमानतळासाठी आणखी काही जागा लागेल, ती मिळवून द्या, इथे चांगले विमानतळ तयार करू. ट्रक टर्मिनलही उभारू, मिरजेसाठी म्युझिक हेरिटेज पार्क उभारू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. महाराष्ट्राची 50 टक्के लोकसंख्या ही शहरांमध्ये राहते. सहा कोटी लोक 40 हजार गावांत राहतात आणि सहा कोटी लोक 400 शहरांत राहतात. शहरातील सहा कोटी लोकांपैकी साडेचार कोटी लोक हे सांगलीसारख्या 29 शहरांमध्ये राहतात. त्यामुळे शहरांचा विकास महत्त्वाचा आहे. शहरांचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे. शहरीकरणाकडे अभिशाप नव्हे, तर विकासाची संधी म्हणून पाहिले जात आहे. केंद्र व राज्य शासन मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही आमच्याकडे; चंद्रकांतदादांचा अजितदादांना इशारा
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, युतीतल्या पक्षांनी एकमेकावर बिलकुल टीका करायची नाही, असे ठरले आहे. मात्र हे किती चालणार, याचा अंदाज घेऊन ठरवू. नगरपालिका निवडणुकीत तिजोरीच्या किल्ल्या आमच्याकडे आहेत, असे म्हटले गेले. मात्र मी त्यावेळी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे, असे म्हटले. आता त्यांची दमबाजीची भाषा सुरू झाली आहे. पण लक्षात ठेवा, मुख्यमंत्री आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्रीही आमच्याकडे आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका, हलक्यातही घेऊ नका, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.