सचिन सुतार
सांगली ः विधानसभा निवडणुका तोंडावर असत्या आणि पूर आला असता, तर किती-किती बरे झाले असते. मागच्यावर्षीसारखे हो. ‘आज आनंदी-आनंद झाला’, असे गाणे गाता आले असते. काय-काय मिळाले होते ते आठवते का? आणि किती मिळालेले? गरज तशी एक डझन केळींची, मिळालेली बारा डझन केळी. म्हणजे ही गोष्टीची ही झाली वनलाईन. दरवर्षी पूर आला की दरवर्षी शासनाने निवडणुका जाहीर कराव्यात, किमानपक्षी मदतीचाही पूर लोकांना आनंद देऊन गेला असता.
मागच्यावर्षी विधानसभा निवडणुका लागणार होत्या. इच्छुकांची फुल्ल गर्दी. हवसे-नवसे-गवसे. किमान पंधराजणांना वाटलेले की, आपणच आमदार व्हायचे. यामध्ये मांडवली बहाद्दर पण होते. उभे राहायचे, प्रचाराचा धडाका उठवायचा, थोडी गुंतवणूकही करायची, थोडी म्हणजे चार आण्याची. त्या भांडवलावर मिळवायचे बाराआणे. जाऊ दे झाडून! ... है पर धंदा है म्हणतात ना, तसे. सत्ताधारी भाजपमध्ये आमदार होण्यासाठी चार-चार गट कामाला लागलेले. काँग्रेसमध्ये दोन, शिंदे शिवसेनेचा एक गट आखाड्यात उतरलेला. याशिवाय अपक्ष, स्वयंघोषित पुढार्यांची मांदियाळीच होती. हरेकाने वकुबानुसार खिसा ढिला केलेला.
पूर जसा-जसा येऊ लागला, तसे-तसे गुडघ्याला बाशिंग बांधलेले भावी आमदार मदतीला सरसावले. पळा-पळा कोण पुढे पळे तो, असे झालेले. भावी आमदारांनी प्रत्येकाने सात-आठ टेंपोंचीच व्यवस्था केलेली. घरातील साहित्य टेंपोतून निवारा केंद्रात नेत होते. माणसांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्याचे भले थोरले पुण्यकाम ते करत होते. प्रत्येक टेंपोत चार-सहा कार्यकर्ते. भावी आमदाराची छबी असणारे टी शर्ट घालून त्याचा डंका पिटत होते.
नाष्ट्याला समोसेपासून अगदी पुरीभाजी, पोहे, मिसळ, कट-वडा, वडा-पाव, कचोरी, अगदी दालचा-राईसही हरेकजण वाटत होता. त्यातही शर्यत लागलेली. तू हे देतोस तर मी तुझ्यापेक्षा भारी नाष्टा देतो. ब्लँकेट काय वाटत होते... बिस्किटाचे पुडे काय... पाण्याच्या बाटल्या काय... विचारूच नका... थप्पी लागलेली. इतकेच नव्हे, तर पूर ओसरल्यानंतर आठवडाभर पुरेल इतके अन्नधान्यही दिले. घरे दिलेली स्वच्छ करून पूर ओसरल्यानंतर घरे कार्यकर्त्यांनी स्वच्छ करून दिलेली होती. औषध फवारणी केली. आरोग्य शिबिरे भरवली.
आपला माणूस... कामाचा माणूस... महान कार्यसम्राट... जिथे विषय गंभीर तिथे खंबीर... एक माणूस उभा आहे-तुमच्यासाठी... अशा कॅचलाईन गाड्यांवर लावून गाड्यांचा ताफाच ताफा फिरायचा. अलिशान गाड्यांची रांग आणि पुढे फटाक्यांची आतषबाजी... आता हे भावी आमदार गेले तरी कोठे ?