Sangli Crime| बसमधून महिलेचे पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास

अज्ञात महिलांच्या टोळीचे कृत्य; बसचा पाठलाग करूनही चोरट्या महिला पसार
Gold Jewellery Theft |
बसमधून महिलेचे पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास
Published on: 
Updated on: 

नागज : आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील एका महिलेच्या पर्समधील सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने आणि दोन हजार रोख रक्कम अज्ञात महिलांनी लंपास केली. ही घटना शुक्रवार, दि. १३ रोजी दुपारी आटपाडी-कवठेमहांकाळ एसटी बसमध्ये घडली. भरदिवसा प्रवासादरम्यान घडलेल्या या चोरीच्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आगळगाव येथील दीपाली युवराज पाटील (वय ३०) या शुक्रवारी दुपारी माहेराहून आटपाडी-कवठेमहांकाळ बसने आपल्या मुलांसह आगळगावकडे येत होत्या. नागज ते आगळगाव फाटा या प्रवासादरम्यान बसमध्ये जवळच बसलेल्या तीन अज्ञात महिलांनी संधी साधून त्यांच्या पर्समधील ३८ ग्रॅम सोन्याचे गंठण व ९ ग्रॅम सोन्याची चेन असे एकूण सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने आणि दोन हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. या चोरीची त्यांना सुरुवातीला कोणतीही कल्पना आली नाही.

दरम्यान, आगळगाव फाट्यावर त्या बसमधून उतरल्या. यावेळी मुलांनी आईस्क्रीम खाण्याचा हट्ट केल्याने त्यांनी पैसे काढण्यासाठी पर्स उघडली असता, आतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे त्यांना मोठा धक्का बसला. बसमध्येच चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी तातडीने स्कूटीवरून बसचा पाठलाग सुरू केला. काही अंतर पाठलाग केल्यानंतर कुची गावाजवळ त्यांनी बस गाठली; मात्र तोपर्यंत संशयित महिला आगळगाव फाटा ते कुची दरम्यान असलेल्या महाराजा ढाब्याजवळ उतरून पसार झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांचा चोरट्या महिलांना पकडण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, २ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.