Sangli Car Sale Fraud : मोटार विक्रीच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांसह सहा जणांवर गुन्हा
 Fraud
FraudPudhari
Published on: 
Updated on: 

सांगली : सांगलीवाडी परिसरात बनावट आरसी बुक देऊन आलिशान कार विक्रीच्या बहाण्याने साडेपाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची आणि खरेदी केलेली कार परस्पर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी व्यावसायिक अथर्व सर्जेराव सूर्यवंशी (वय २५, रा. जे. के. पवार पार्क, सांगलीवाडी, जि. सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय सुनील गटमळ (रा. कासारवाडी, जि. कोल्हापूर), प्रणेश भोसले (रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) आणि त्यांच्या इतर चार अनोळखी साथीदारांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी अथर्व सूर्यवंशी यांना (एमएच ०२ ईझेड ४७०२) क्रमांकाच्या आलिशान मोटारीचे बनावट आरसी बुक दिले. त्यातील एकाने स्वतःचे खोटे नाव सांगून सूर्यवंशी यांना कार विकण्याचे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर संशयितांनी त्यांच्याकडून ५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम घेतली आणि राजवाडा चौक येथे खरेदी-विक्रीची रीतसर नोटरी करून दिली.

व्यवहार पूर्ण झाल्यानंतर सूर्यवंशी यांनी ही गाडी जे. के. पवार पार्क येथील आपल्या घरासमोर पार्किंगमध्ये लावली होती. मात्र, त्याच रात्री संशयित अक्षय गटमळ, प्रणेश भोसले व त्यांच्या साथीदारांनी अन्य एका मोटारीतून येऊन पार्किंगमध्ये उभी असलेली ती कार परस्पर चोरून नेली. फसवणूक लक्षात येताच सूर्यवंशी यांनी पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास सांगली शहर पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news