

पलूस : महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील पडीक, खडकाळ, माळरान, डोंगराळ तसेच ओसाड जमिनीवर राबविण्यात आलेल्या बांबू लागवड प्रकल्पाला उल्लेखनीय यश मिळाले असून, लागवडीपासून तोडणीपर्यंतचे राज्यातील पहिले यशस्वी मॉडेल म्हणून या प्रयोगाकडे पाहिले जात आहे.
मृदा व बांबू तज्ज्ञ तसेच सांगली जिल्हा परिषदेचे मास्टर ट्रेनर डॉ. दीपक यरटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाकाळापासून सुरू करण्यात आलेल्या बांबू लागवडीची आता यशस्वी तोडणी झाली आहे. बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३,५०० ते ४,००० रुपये दराने उत्पन्न मिळाले असून, सर्व शेतकरी या प्रयोगाबद्दल समाधान व्यक्त करत आहेत.
पूर्वी ज्या जमिनीमध्ये कोणतेही पीक घेतले जात नव्हते किंवा केवळ पावसाच्या पाण्यावर अतिशय कमी उत्पन्न मिळत होते, अशा जमिनींमध्ये अवघ्या साडेचार वर्षांत एकरी १५ ते ३२ टनांपर्यंत बांबूचे उत्पादन मिळाले आहे. बांबूच्या गुणवत्तेनुसार शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळाल्याने हा पर्याय आता आर्थिकदृष्ट्याही अत्यंत फायदेशीर ठरत आहे.
डॉ. यरटे यांनी पुढे सांगितले की, २०२७ नंतर होणाऱ्या बांबू तोडणीमध्ये गुणवत्तेनुसार प्रतिटन ४,००० ते ६,००० रुपयांपर्यंत दर मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा (मनरेगा) लाभ घेत बांबू लागवडीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त केले आहे.