

सांगली ः राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणार्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिलाच इंग्रजीचा पेपर कॉपीमुक्त झाला. जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाला नाही, अशी माहिती ‘माध्यमिक’चे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी दिली.
जिल्ह्यात 320 उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. या विद्यालयांतील 51 केंद्रांवर 32 हजार 509 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोेंदणी केली आहे. मंगळवारी पहिलाच इंग्रजीचा पेपर होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या चेहर्यावर तणाव दिसत होता. परीक्षा केंद्रावर सकाळी 9 वाजल्यापासून विद्यार्थी आणि पालकांनी गर्दी केली होती. अनेक पालक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवत होते. केंद्राच्या आत जाण्यापूर्वी काही विद्यार्थी हातात पुस्तक घेऊन उजळणी करीत होते. केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता. जिल्ह्यात यंदा कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळेअनेक केंद्रांवर ड्रोनच्या घिरट्या सुरू होत्या. तसेच सीसीटीव्हीचा वॉचही ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांची कडक तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता.
परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात शिक्षण, गटविकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख अशा अधिकार्यांचा समावेश असलेल्या एकूण 40 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी दिवसभर वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भेट दिली. तसेच सर्व केद्रांवर स्वतंत्र पथक थांबून होते. जिल्ह्यात सर्वच परीक्षा केंद्रांवर परीक्षा वेळेत सुरू झाली. कोणताही गैरप्रकार न होता पहिला पेपर शांततेत पार पडला. कोठेही कॉपीचा प्रकार आढळला नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अप्पर अधीक्षक रितू खोखर यांनी विलिंग्डन कॉलेजमध्ये भेट दिली. यावेळी ‘माध्यमिक’चे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे उपस्थित होते.