

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर झालेला खुनीहल्ला हा पूर्वी झालेल्या वादातून झाल्याची माहिती समोर आली आहे. सुनील माळी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, त्यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दोघा संशयितांना सांगली शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर अद्याप एक पसार असून त्याचा शोध सुरू आहे.
महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी हे मंगळवारी कार्यालयीन कामकाज आटोपून घरी गेले होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर घरासमोरच दबा धरून बसलेल्या दोघा हल्लेखोरांनी खुनीहल्ला केला होता. सुनील माळी यांच्या फुफ्फुसामध्ये चाकू अडकल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्यावर सुरुवातीला टिंबर एरियामधील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर दुसऱ्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, सुनील माळी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुनील माळी यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोघा संशयित हल्लेखोरांचा शोध सांगली शहर पोलिसांनी मंगळवारी रात्रीपासूनच सुरू केला होता. माळी यांच्यावर हल्ला झालेल्या ठिकाणी असणारे मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्याआधारे हा शोध घेतला. दरम्यान, याप्रकरणी दोघा हल्लेखोर संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर अद्याप एक पसार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुनील माळी यांचा काही दिवसांपूर्वी एकासोबत वाद झाला होता. याच वादातून त्यांच्यावर हा खुनीहल्ला झाल्याचे आता समोर आले आहे. तीन महिन्यांपूर्वीही माळी यांच्यावर काठीने हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी ते बचावले होते. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रारी अर्ज देऊन, सुरक्षा देखील मागितली होती. परंतु पुन्हा आता त्यांच्यावर खुनीहल्ला झाल्यामुळे खळबळ उडाली होती. माळी यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी हल्ला केलेल्या संशयितांनीच हा हल्ला केला का? याबाबत देखील आता सांगली शहर पोलिसांकडून तपास केला जात आहे.
माळींना नको होते इन्चार्ज पद?
सुनील माळी हे सध्या महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून कार्यरत होते. यातून काही वेळा त्यांचे इतरांसमवेत खटके देखील उडाले होते. त्यामुळे अग्निशमन विभागाचे इन्चार्ज पद नको, असेही त्यांनी आयुक्तांना सांगितले असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. त्यांना हे पद का नको होते, याबाबतही आता उलटसुलट चर्चा सुरू आहे.