

कोकरूड : मांगरूळ (ता. शिराळा) येथे गुरुवार, दि. ८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जनावरांच्या शेडला लागलेल्या भीषण आगीत खिलार गाय आणि तिच्या दोन महिन्यांच्या वासराचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत अन्य सहा गाई ७५ ते ८० टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेत पशुपालक शेतकरी सुधीर मारुती पाटील यांचे नुकसान झाले आहे.
येथील सर्व्हे क्रमांक ९९/२ मधील शेतात असलेल्या सुधीर पाटील यांच्या जनावरांच्या शेडला गुरुवारी रात्री अचानक आग लागली. आगीची तीव्रता जास्त असल्याने शेडमधील जनावरांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्घटनेत एका खिलार गाईचा आणि तिच्या दोन महिन्यांच्या वासराचा जागीच मृत्यू झाला. आगीत जखमी झालेल्या अन्य सहा गाई ७५ ते ८० टक्के भाजल्याची नोंद महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालात करण्यात आली आहे.
दरम्यान, मांगरूळच्या ग्राम महसूल अधिकारी एच. के. मोरे यांनी या घटनेचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची सखोल चौकशी करून पंचनामा करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.