

मिरज : बेडग (ता. मिरज) येथे उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणातून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला. याप्रकरणी दोन्ही गटाकडून परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संभाजी रामचंद्र चवदार यांनी शंकर मल्हारी खाडे, प्रवीण शंकर खाडे, प्रदीप केशव खाडे आणि शशिकांत विठ्ठल धोंड यांच्याविरुद्ध, तर शंकर मल्हारी खाडे यांनी संभाजी रामचंद्र चवदार, चैतन्य रामचंद्र चवदार, गजानंद ओंबासे व अन्य दोन अनोळखी, यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
शंकर खाडे यांनी संभाजी चवदार यांना उसने पैसे दिले होते. ते पैसे परत देण्यासाठी शंकर खाडे यांनी संभाजी चवदार यांच्याकडे तगादा लावला होता. परंतु त्यांनी रक्कम परत दिली नव्हती. ही रक्कम परत मागण्यासाठी शंकर खाडे यांच्यासह सर्वजण संभाजी चवदार यांच्याकडे बेडग येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्यात वादावादीचा प्रकार घडला. त्यानंतर वादावादीचे पर्यावसन मारामारीत झाले. यावेळी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी व काठीने मारहाण करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दोन्ही गटाकडील 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.