

पलूस : वसगडे (ता. पलूस) येथील रेल्वेमुळे 195 गुंठे जमीन रेल्वेमुळे बाधित झाली होती. पण महसूल विभागाने केलेल्या मोजणीनुसार फक्त 55 गुंठे जमिनीचा मोबदला व त्याचे व्याज रेल्वे देण्यास तयार होती. त्यामुळे वसगडे येथील रेल्वे बाधित शेतकर्यांनी मागील 38 महिन्यांपासून जलसमाधी आंदोलन, रेल्वे रोको आंदोलन चालू केले होते. या आंदोलनामुळे अर्धे यश शेतकर्यांना मिळाले होते. परंतु 14 जुलैपासून शेतकर्यांना मिळणार्या मोबदल्याविषयी रेल्वे बाधित शेतकर्यांनी उपोषण सुरू केले होते. मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला होता.
सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी उपोषणास्थळी भेट दिली. यावेळी पद्मसिंह जाधव, मध्य रेल्वेचे पुणे विभागीय व्यवस्थापक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, डीवायसीइ दीपक कुमार, तासगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार दीप्ती रिठ्ठे, यांना उपोषणस्थळी बोलावून 195 गुंठे जमिनीचा मोबदला व शासकीय नियमानुसार व्याज रेल्वे प्रशासनाने लेखी दिले व शेतकर्यांच्यावर खंडणीचा आरोप करून केलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याचे लेखी आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिल्यानंतर तब्बल 38 महिन्यांपासून सुरू असलेले हे उपोषण कुलदीप पाटील, सुनील पाटील, गजानन केरपाले, आनंद हजारे, रजत पाटील यांनी माजी जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण स्थगित केले. यावेळी अमोल पाटील, निलेश चव्हाण, अनिल पाटील, श्रेणिक पाटील, जवाहर पाटील, नारायण खटावकर उपस्थित होते.