

चंद्रकांत जाधव
बोरगाव : आम्ही कोणत्याही प्रकारच्या महामार्गाची मागणी केलेली नसताना शक्तिपीठ महामार्ग हवाच कशाला? असा सवाल करीत कृष्णा व वारणा काठचा शेतकरी प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात निर्णायक लढाईसाठी सज्ज झाला आहे. महामार्गामुळे घरे, बागायती जमिनी, रोजगार-व्यवसाय यांसह गावांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा दावा करीत बाधित शेतकर्यांनी शासनाने प्रकल्पाचा रेटा कायम ठेवल्यास तीव्र संघर्षाचा इशारा दिला आहे.
शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्यावतीने शुक्रवार, २१ ऑगस्टरोजी सांगलीत विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी वाळवा तालुक्यासह कृष्णा व वारणाकाठच्या गावा-गावांतून शेतकर्यांची मोठी फौज सज्ज झाली आहे. सकाळी दहा वाजता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
वाळव्यातील ११ गावे बाधित?
वाळवा तालुक्यातील सुमारे ११ गावे, १,३४२ गट आणि २८६ एकर जमीन महामार्गासाठी जाणार असल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे. शेती हेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असताना जमीन गेल्यास अनेक कुटुंबांवर भूमिहीन होण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने निर्णय लादण्याऐवजी बाधित शेतकर्यांशी थेट संवाद साधावा, अशी मागणी होत आहे.
समांतर मार्ग असताना शक्तिपीठ कशासाठी?
समांतर रस्ता उपलब्ध असताना नव्या शक्तिपीठ महामार्गाची गरज काय? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. हा प्रश्न केवळ बाधित शेतकर्यांपुरता मर्यादित नसून व्यापारी, कष्टकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना आंदोलनात सहभागी होत आहेत.
शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला व्यापक राजकीय पाठबळ मिळत आहे. खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, समाजसेवक रविराज साबळे, ॲड. दीपक लाड यांच्यासह विविध नेते व पदाधिकारी मोर्चात सहभागी होणार आहेत.
गावा-गावांत बैठकांचा धडाका...
शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणार्या वाळवा तालुक्यातील कृष्णा व वारणाकाठच्या गावांमध्ये आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे. गावागावांत बैठका घेऊन शेतकर्यांना मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. काहीही झाले तरी शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, असा निर्धार शेतकर्यांनी व्यक्त केला आहे. शेतकरी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सांगलीतील मोर्च्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष समितीने गावोगावी बैठका घेऊन केले आहे.
आता निर्णायक लढाई!
भूमिहीन होणारे शेतकरी, बाधित गावांचे अस्तित्व आणि पुढील पिढ्यांचे भवितव्य वाचविण्यासाठी संघर्ष समितीने आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे २१ ऑगस्टचा सांगलीतील विराट मोर्चा शासनाच्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूमिकेविरोधातील निर्णायक एल्गार ठरणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शेतकरी उद्ध्वस्त करून विकास नको!
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून पुढे आणला जात असलेला शक्तिपीठ महामार्ग शेतकर्यांच्या मुळावर उठणारा असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. महामार्गाच्या संभाव्य दुष्परिणामांची माहिती शासनाला वारंवार देऊनही निर्णय बदलला जात नसल्याने शेतकर्यांमध्ये संताप वाढला आहे. शेतकरी उद्ध्वस्त करून विकास नको, अशी भूमिका घेत महामार्ग रद्द करण्यासाठी आरपारच्या संघर्षाचा इशारा देण्यात आला आहे.