

सांगली : मालगाव (ता. मिरज) येथील तानंग रस्त्यावर डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून शेतमजुराचा खून करण्यात आला. बहादूर चाँद देसाई (वय 54, रा. मालगाव) असे मृताचे नाव आहे. त्यांचे गावातील काहीजणांसोबत भांडण झाले होते. या वादातून त्यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बहादूर देसाई हे शेतात मजुरीचे काम करीत होते. गुरुवारी सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे ते कामासाठी बाहेर पडले. सकाळी 11 वाजता कळंबी कालव्याचा पिछाडीस तानंग रस्त्याकडेला त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत बहादूर यांच्या अंगावर जखमा होत्या. तोंडातून रक्त आल्यामुळे त्यांचा मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. सहा महिन्यापूर्वी त्यांचे गावात काही जणासोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते.
यावेळी त्यांना बेदम मारहाण केल्याने त्यांनी एकावर ब्लेडने वार केले होते. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या. मृत बहादूर यांची पत्नी व मुलगा पुणे येथे वास्तव्यास असल्याने ते गावात एकटेच राहत होते. मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाणीमुळे मोठी जखम होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीच्या अहवालात स्पष्ट झाले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चौकशीसाठी मालगाव येथील तिघांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.